
पंचायत समितीच्या तीन लाख 45 हजार रुपयांच्या सेस निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना केअर सेंटरला ऑक्सिजन मशिन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती रेखा घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, खटाव पंचायत समितीच्या सेस निधीतून तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना व मायणी, पुसेगाव येथील कोरोना केअर सेंटरला ऑक्सिजन मशिनही देण्यात आल्याचे त्या म्हणाले.
वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची जाणवणारी आवश्यकता लक्षात घेऊन पंचायत समितीने सेस निधीतून आरोग्य विभागासाठी दिलेल्या ऑक्सिजन मशिनचा रुग्णांना आगामी काळात निश्चितच चांगला फायदा होईल, असे मत सभापती रेखा घार्गे यांनी व्यक्त केले.
खटाव पंचायत समितीच्या सेस निधीतून तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना व मायणी, पुसेगाव येथील कोरोना केअर सेंटरला अशा एकूण नऊ ऑक्सिजन मशिन देण्यात आल्या. त्यावेळी सभापती घार्गे बोलत होत्या. यावेळी उपसभापती आनंदराव भोंडवे, माजी सभापती संदीप मांडवे, सदस्या जयश्री कदम, नीलादेवी जाधव, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पुसेगावचे माजी उपसरपंच रणधीर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेरुलिंग पठारावर पसरलाय फुलांचा गालिचा; पर्यटक प्रफुल्लित
सौ. घार्गे म्हणाल्या, "पंचायत समितीच्या तीन लाख 45 हजार रुपयांच्या सेस निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना केअर सेंटरला ऑक्सिजन मशिन देण्याचा निर्णय घेण्यात आला.'' संदीप मांडवे म्हणाले, "पंचायत समिती सदस्यांनी कोरोना काळात विकासकामांवर खर्च न करता त्यांचा सेस निधी ऑक्सिजन मशिनसाठी द्यावा, असा प्रस्ताव आपण मासिक बैठकीत मांडला. त्यास सर्वच सदस्यांनी एकमुखाने संमती दिली.'' तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांनी तालुक्यातील कोरोना संसर्ग व उपाययोजनांबाबत माहिती दिली. गटविकास अधिकारी श्री. काळे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र मेढेवार यांनी आभार मानले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे