वनौषधींसाठी राबताहेत डॉक्‍टरांचे हात 

वनौषधींसाठी राबताहेत डॉक्‍टरांचे हात 

पिंपरी - डॉक्‍टर म्हटलं की सुई, इंजेक्‍शन, गोळ्या आणि कुठली तरी शस्त्रक्रिया असे शब्द व प्रसंग डोळ्यांसमोर येतात. अन्‌ टिकाव, फावडे, खुरपे आणि मशागत म्हटलं तर...? शेतकरीच, असे समीकरण सर्वांना माहिती आहे; परंतु भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमध्ये गेले तर डॉक्‍टरांकडे शेतकऱ्यांची अवजारे दिसतात आणि त्यांचे राबणारे हातही. कारण, उद्यानात त्यांनी वनौषधी रोपे लावली असून, त्यांची निगा राखली जात आहे. त्यासाठी दररोज सकाळी सात ते नऊ असे दोन तास त्यांचे श्रमदान सुरू आहे. 

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशनच्या (निमा) पिंपरी-चिंचवड शाखेने वनौषधी उद्यान उभारले आहे. भोसरीतून टेल्को रस्त्याने निगडीकडे येताना लांडेवाडीजवळील शांतीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर आतील रस्त्यावर एस ब्लॉकमध्ये प्लॉट क्रमांक 43 वर 44 गुंठे जमिनीवर हे उद्यान फुलवले जात आहे. महापालिकेने 33 वर्षांच्या कराराने ही जागा निमाला दिली आहे. यातील काही झाडे 20 फुटांपर्यंत उंच वाढलेली असून, काही वनौषधी रोपे महिन्यापूर्वी लावली आहेत. यात करंज, कांचन, आवळा, चिंच, कोरपड, सप्तपर्णी, पळस, वड, पिंपळ, शिसम, जांभूळ, एरंड, कडूलिंब अशी विविध प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. त्यांच्यासाठी पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. 

पावसातही मेहनत 
रविवारी (ता. 28) सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरीही डॉक्‍टर उद्यानात आले होते. झाडांभोवतीचे गवत खुरपण्याचे काम सुरू होते. ते गवत कडेला न टाकता किंवा फेकून न देता उद्यानातच कुजवले जात आहे. त्यापासून सेंद्रिय खत रोपांना मिळणार आहे. डॉक्‍टरांच्या जोडीला आज सिद्धिविनायक निसर्ग ग्रुपचे स्वयंसेवकही आले होते. त्यांच्या जोडीला निमाचे शाखा अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील, डॉ. अभय तांबिले, डॉ. महेश पाटील, डॉ. नीलेश लोंडे, डॉ. उत्तम माटे, डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. महेश निघोजकर, डॉ. सुधीर काटे, डॉ. विजय उपासनिक यांचा समावेश होता. 

काय आहे निमा? 
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ही देशातील डॉक्‍टरांची संस्था आहे. त्यांची पिंपरी-चिंचवड शाखेचे बाराशेवर सदस्य आहेत. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिरे, वैद्यकीय चर्चासत्रे, विविध आजारांवर मोफत मार्गदर्शन, वृक्षारोपण, वनौषधी लागवड, त्यांचे संवर्धन व संशोधन असे समाजोपयोगी उपक्रम ही संघटना राबवित आहे. 

उन्हाळ्यातील सवंर्धन 
उन्हाळ्यात वनौषधी रोपांना पाणी देण्यासाठी डॉ. सत्यजित पाटील, डॉ. अभय तांबिले, डॉ. दत्तात्रेय कोकाटे, डॉ. नंदकुमार माळशीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव संकल्पना राबविण्यात आली. त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या वापरल्या. त्यांच्या झाकणांना बारिक छिद्र पाडून त्यात सुतळी ओवून सोडली. सुतळीचे दुसरे टोक रोपांच्या बुंध्यांजवळ ठेवले. बाटली उलटी ठेवली. त्यामुळे त्यातील पाणी झाकणाच्या छिद्रातून सुतळीच्या साह्याने रोपांना मिळत होते. ठिंबक सिंचनाचा हा अनोखा प्रकार राबवून उन्हाळ्यातही रोपांचे संवर्धन व संगोपन केले. एका बाटलीतील पाणी साधारणतः तीन दिवस पुरते, असे डॉ. पाटील व डॉ. तांबिले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com