नाट्यकला शिकवतेय बरंच काही 

- नीला शर्मा 
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नाटक करता करता सहजपणे जीवन जगण्यातली गंमत अनेक मुलांना समजली आहे. स्वत:मधल्या क्षमता हेरून त्या आणखी वाढविण्याचा ध्यास त्यांना मार्गदर्शक स्वातीताईंमुळे जडलाय. 

नाटक करता करता सहजपणे जीवन जगण्यातली गंमत अनेक मुलांना समजली आहे. स्वत:मधल्या क्षमता हेरून त्या आणखी वाढविण्याचा ध्यास त्यांना मार्गदर्शक स्वातीताईंमुळे जडलाय. 

""नाटक या कलेत साहित्य, चित्र, संगीत, नृत्य यांसारख्या अनेक कलांचा मिलाफ कल्पकतेनं केलेला असतो. आरेखन व वास्तुरचना या शास्त्रांचीही ओळख त्यातून पटते. मनोरंजन करता करताच नाट्यक्षेत्र आपल्याला जीवनातील चढ-उतारांसाठी निरनिराळ्या कथानकांच्या माध्यमातून सज्ज करतं. जीवनातील सुख ओळखण्याची कला शिकवत असतानाच ते दु:ख पचवायची ताकदही देतं. अभिव्यक्तीचं तंत्र आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास देतं. मोकळं व्हायची संधी देतं; पण संयमाचं महत्त्वही लक्षात आणून देतं. अशा या बहुमोल कलाप्रकाराचा अनुभव प्रत्येक मुलानं कधी ना कधी घेऊन पाहावाच,'' असं बालनाट्य क्षेत्रातील रंगकर्मी स्वाती उपाध्ये आवर्जून सांगतात. 

त्या म्हणाल्या, ""नाटक उभं करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपल्यात अनेक बदल होतात. नाटकाचा विषय, कथेची संकल्पना, तिचा विस्तार, दिग्दर्शन, प्रकाश योजना, वेशभूषा, नेपथ्य वगैरे सर्वच कामांमधून निरनिराळं काही शिकायला मिळतं. त्यामुळे फक्त अभिनय करण्याच्याच मागं लागू नये. उलट प्रत्येकानं प्रत्येक प्रकारची कामगिरी विचारपूर्वक करून पाहिल्यास आपण जी निवडू ती कामगिरी जास्त छान होईल. कित्येक मुलांना अभिनयापेक्षाही प्रकाश योजना, नेपथ्य यांपैकी कशात तरी रमावंसं वाटू शकतं. त्यातील आव्हान घेऊन मेहनत करावी. नाटकासाठीची समज वाढविण्यासाठी फक्त नाटक एके नाटक न करता किंवा इतर मंडळींनी केलेली केवळ नाटकंच न बघता गायन, वादन, नृत्य, चित्र व शिल्पप्रदर्शनांचाही आस्वाद घ्यावा. त्यामुळे अभिरुची विकसित व्हायला मदत होते. 

स्वातीताईंनी असंही सांगितलं, की नाटक उभं करण्याच्या प्रयत्नांत सगळ्यांशी जमवून घेणं, दुसऱ्यांना समजून घेणं व समजावून सांगणं यामुळे आपली सामाजिक कौशल्यं वाढतात. नवीन काही शोधण्यातून सर्जनशील विचार व कल्पनांची क्षमता निर्माण होते. स्पर्धायुक्त वातावरणाला समर्थपणे तोंड देण्याची ताकद येते. जबाबदारीची जाणीव वाढून भरीव योगदान करण्याची सवय जडते. फक्त स्वत:च्याच कौतुकात दंग होण्याऐवजी इतरांमधल्या गुणांबद्दल आदर निर्माण होतो. आत्मपरीक्षणाचं महत्त्व कळतं. यासाठी मुलांनी नाट्यनिर्मितीतली मौज अवश्‍य अनुभवून पाहावी.

Web Title: Drama teaches a lot about the person