esakal | एका अवलियाने बनवली बांबूपासून इकोफ्रेंडली सायकल 
sakal

बोलून बातमी शोधा

एका अवलियाने बनवली बांबूपासून इकोफ्रेंडली सायकल 

एका अवलियाने बनवली बांबूपासून इकोफ्रेंडली सायकल 

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद - शहरातील एका अवलियाने बांबूपासून सायकल बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. काही ठराविक भाग वगळता भाऊसाहेब अणदूरकर यांनी बांबूपासून बनविलेली ही इकोफ्रेंडली सायकल जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 

बांबूपासून विविध उपयोगी वस्तू बनिल्या जातात. पण, शहरातील भाऊसाहेब यांनी चक्क बांबूपासून सायकल बनविण्याचा प्रयोग केला आहे. दोन चाके, चैन सिस्टीम, हॅंडल वगळता इतर भाग त्यांनी बांबूपासून बनविले आहेत. भाऊसाहेब यांनी बाजारातून विकत आणलेल्या बांबूपासून ही सायकल तयार केली. कालांतराने बांबूला कीड लागू नये म्हणून त्यावर प्रक्रियाही केली. सायकलचा संपूर्ण साचा बांबूपासून बनविला आहे. त्याला लोखंडाचे हॅंडल जोडले. शिवाय दोन चाके, चैन पॅकेट बाजारातून विकत घेतले. संपूर्ण सायकलसाठी सुमारे दोन हजार 700 रुपयांचा खर्च आला. सध्या नामांकित कंपन्यांच्या सायकल बाजारात आहेत. त्यांचे वजन 15 ते 20 किलोच्या दरम्यान असते. बांबूपासून तयार केलेल्या या सायकलचे वजन केवळ 12 किलो आहे. बाजारात सध्या एका सायकलची किंमत पाच ते सात हजार रुपये असते. परंतु, भाऊसाहेब यांनी बांबूपासून बनविलेल्या सायकलची किंमत तीन हजारापेक्षाही कमी आहे.

राज्यातील चिचपल्ली येथे बांबूपासून पहिली सायकल बनविली होती. त्यातून प्रेरणा घेत मी ही सायकल तयार केल्याचे भाऊसाहेब सांगताहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात चांगल्या दर्जाचा बांबू मिळत नाही. त्यामुळे सायकलचे काही भाग विकत घ्यावे लागले. फिलीपाईन्स देशात बांबूपासून बनविलेल्या सायकली मोठ्या प्रमाणात आहेत. यू-ट्युबवरुन इकोफ्रेंडली सायकलची माहिती मिळविली. एक-एक भाग तयार केल्यानंतर ही सायकल बनविल्याचे भाऊसाहेब सांगतात. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दुसरी सायकल बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी चैन-पॅकेट सोडून इतर सर्व बाबी बांबूपासून बनविण्याचा त्यांचा मनोदय आहे. अपेक्षित दर्जाचा बांबू शोधण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळी भागात बांबूपासून सायकल तयार करण्याचा उद्योग उभा करण्याचा भाऊसाहेबांचा मनोदय आहे. दरम्यान, त्याने बनविलेली इकोफ्रेंडली सायकल सध्या सर्वांचे आकर्षण ठरत असून घरगुती कामासाठी या सायकलचा वापर केला जात आहे. 

loading image