उच्चशिक्षित तरुणांचे दूध उत्पादनात करिअर 

सर्जेराव नावले
गुरुवार, 12 जानेवारी 2017

कोल्हापूर - शिक्षण पूर्ण करावं, चांगली नोकरी मिळवावी, करिअर घडवावं, अशी प्रत्येक सर्वसामान्य तरुणांची माफक अपेक्षा. याला फाटा देत शिक्षणाचा उपयोग शेती व दुग्ध व्यवसायात करून स्वत:ची वेगळी पायवाट धुंडाळण्याचा प्रयत्न प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ध्येयवेड्या तरुणांनी केला आहे. कष्टाच्या जोरावर जिल्ह्यातील धवल क्रांतीला बळ देऊन गावातील जिगरबाज 40 तरुणांनी गोठा प्रकल्प यशस्वी केले आहेत. या तरुणांकडून प्रतिदिन 1450 लिटरसह अन्य उत्पादकांचे सुमारे 3600 लिटर दूध येथून जाते. 

कोल्हापूर - शिक्षण पूर्ण करावं, चांगली नोकरी मिळवावी, करिअर घडवावं, अशी प्रत्येक सर्वसामान्य तरुणांची माफक अपेक्षा. याला फाटा देत शिक्षणाचा उपयोग शेती व दुग्ध व्यवसायात करून स्वत:ची वेगळी पायवाट धुंडाळण्याचा प्रयत्न प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ध्येयवेड्या तरुणांनी केला आहे. कष्टाच्या जोरावर जिल्ह्यातील धवल क्रांतीला बळ देऊन गावातील जिगरबाज 40 तरुणांनी गोठा प्रकल्प यशस्वी केले आहेत. या तरुणांकडून प्रतिदिन 1450 लिटरसह अन्य उत्पादकांचे सुमारे 3600 लिटर दूध येथून जाते. 

1989 च्या पंचगंगेला आलेल्या महापुराने प्रयाग चिखली शासनदरबारी पूरग्रस्त म्हणून नोंदले. दरवर्षी पुराने शेतीचे होणारे नुकसान येथील भूमिपुत्राला आतबट्टयात आणणारे ठरले. शेतीचे आर्थिक गणित विस्कटले. जोड धंदा म्हणून येथील तरुणांनी दुग्धव्यवसाय करून अर्थकारणाला बळ देण्याचे ठरविले. आणि यातून येथील 35 ते 40 जणांनी 4 पासून ते 40 पर्यत दुभती जनावरे पाळली. प्रत्येकाच्या गोठ्यात हत्तीसारख्या झुलणाऱ्या "एचएफ' आणि जर्सीसारख्या संकरित गाई आणि म्हशी पाहिल्या की उच्चशिक्षित तरुणांनी पशुपालनातून यशस्वी अर्थकारण केल्याची प्रचिती मिळते. 

तिन्ही बाजूंनी पंचगंगा नदी आणि काठावरची हिरवीगार गवती कुरणे आणि बारमाही मिळणारा हिरवा चारा आणि जोडीला कष्ट हेच या व्यवसायचं यशस्वी सूत्र असल्याचं या तरुणांचं मत आहे. 

या तरुणांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. जनावरांची स्वच्छता करणे, धारा काढणे, डेअरीत वेळेत दूध घालणे आणि वैरण आणणे यासाठी त्यांनी वेळेचं गणितही जमविले आहे. सकाळी दहा ते साडेदहा वाजता पहिल्या टप्प्यातील त्यांचे काम होते. 

ते गावागावातल्या चौकात, पारावर गप्पा मारत निवांत बसलेले हमखास दिसतात. नवखा माणूस गावात आला तर बसलेले तरुण टवाळ्या करत बसलेत की काय, अशी शंका आल्यावाचून राहणार नाही. पण या जिगरबाज तरुणांचं नियोजन पक्के आहे. दुपारी बारानंतर जेवण करून झोपायचं आणि चार वाजता जनावराचं शेणघाण काढून सायंकाळी सहा ते सातपर्यंत डेअरीला दूध घालण्याची यांची परत लगबग सुरू होते. सायंकाळी सात वाजता पुन्हा काम आटोपून मोकळे होतात. हाताला श्रम आणि श्रमाला प्रतिष्ठा दिली तर जीवन सुखकर होते याचा मंत्रच हे तरुण देतात. 

'4 वर्षे सहकारी संस्थेत क्‍लार्क म्हणून काम केले. मिळणारा 4 हजार पगारात घरखर्च आणि उदरनिर्वाह चालेना. नोकरीचा राजीनामा देऊन सुरवातीला 2 जर्सी गायी घेतल्या. दोनाच्या चार करत आज चौदा गायी गोठ्यात आहेत. 10 वर्षापासून स्वतः कष्ट करून या व्यवसायात यश मिळविले आहे.यात आज समाधानी आहे.'' 
- शशिकांत यादव, दूध उत्पादक 

'या तरुणांनांच्या पशुपालनाला दूध संस्थेच्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाधिक तरुणांना त्याच्या दोनाच्या चार आणि चाराच्या आठ गाई कशा होतील, यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यांचे हे कार्य अन्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे.'' 
- संभाजी गणपती पाटील. संस्थापक अध्यक्ष, संभाजीराजे दूध संस्था 

दूध क्रांतीसाठी सहभाग 
जिल्हा (गोकुळ) दूध संघाने दुधाचा महापूर योजनेतून जिल्हात प्रथमच बंगळूरवरून संकरित गाई, गुजरातवरून म्हशींची आयात केली. त्यावेळी दूध उत्पादकांत या जनावरांच्या जपणुकीबाबत, माहितीबाबत संभ्रम होता. त्यावेळी प्रयाग चिखलीतील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम या संकरित गायी, म्हशी आपल्याकडे आणून गोकुळच्या दूध क्रांतीला सर्वप्रथम सहभाग दिला.

Web Title: Educated youth career milk production