विद्यार्थ्यांनी बनवली ‘इलेक्‍ट्रिक सायकल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

नागरिकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी ‘इलेक्‍ट्रिक सायकल’ पुण्यात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या सायकलसाठी येणारा खर्च अत्यंत माफक असल्याने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थांना तसेच अन्य गरजवंतांना ही सायकल उपयुक्त ठरू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

पुणे - नागरिकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी ‘इलेक्‍ट्रिक सायकल’ पुण्यात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या सायकलसाठी येणारा खर्च अत्यंत माफक असल्याने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थांना तसेच अन्य गरजवंतांना ही सायकल उपयुक्त ठरू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

शहरातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इस्टिट्युशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयातील इलेक्‍ट्रिकल विभागाचे ऋतुराज बोकील, अवधूत गोडे आणि स्वप्नील खराटे या तिघांनी या ‘इलेक्‍ट्रिक सायकल’ची निर्मिती केली आहे. 

या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे, ही इलेक्‍ट्रिक सायकल दहा हजार रुपयांमध्ये तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेव्हा सायकल चालेल तेव्हा ती चार्जसुद्धा होते. त्यामुळे बॅटरी चार्जिंगसाठी खर्चही कमी येतो.

‘‘सकाळी व्यायामासाठी ही सायकल उपयोगात आणून ती चार्ज झाल्यानंतर आपण ती वापरू शकतो,’’ असे बोकील याने सांगितले. 

या प्रकल्पासाठी विद्यार्थांना प्राचार्य डॉ. पी. बी. माने , प्रा. एस. एस. शिंगारे व प्रा. एस. एम. चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Bicycle made by students