अभियंत्यांच्या मुखी, राम कृष्ण हरिऽऽऽ 

पीतांबर लोहार
सोमवार, 18 जून 2018

वारकरी आणि नारदीय असे दोनकीर्तन प्रकार शिकविले जात आहेत. चार वर्षांचा हा प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम आहे. संगीत, संस्कृत व मराठी सुभाषिते, व्याकरण शिकविले जाते. प्रात्यक्षिक घेतले जाते. पदवीला समकक्ष हा अभ्यासक्रम आहे. 
- लिंबराज महाराज जाधव, कीर्तन अध्यापक 

पिंपरी : "हरिऽ जय जय राम कृष्ण हरि...' असा गजर असो वा "पांडुरंग करू प्रथम नमन..' असा नामाचा अभंग. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी...' अथवा "अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने...' अशा अभंगांचे निरूपण करत डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर, औषधनिर्माता असे विज्ञानवादी कीर्तनाचे धडे गिरवत आहेत. 

वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. त्याचेच एक अंग म्हणजे कीर्तन. मनोरंजनातून समाजप्रबोधनाचे माध्यम. वारकरी आणि नारदीय अशा दोन कीर्तनपद्धती प्रचलित आहेत. त्यांचा अभ्यास करण्याची सोय देहू, आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्‍वर आदी ठिकाणी आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावर कीर्तन प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम भारती विद्यापीठाने सुरू केला असून, त्याचे विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्‍टर, वकील, औषधनिर्माण व वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस विभागातून ते कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत. 

मॅकेनिकल इंजिनिअर म्हणाले... 
मोशीतील मॅकेनिकल इंजिनिअर व कीर्तन शिकणारे विद्यार्थी रोहित बोराटे म्हणाले, ""सहा वर्षांपूर्वी मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. स्वतःच व्यवसाय सुरू केला; पण समाजातील कौटुंबिक कलह व आई-वडिलांचा सांभाळ न करण्याची मुलांची भूमिका यामुळे मन विषण्ण व्हायचे. अशा व्यक्तींचे प्रबोधन झाले पाहिजे, असे वाटायचे. त्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे कीर्तन आहे, असे जाणवले. कारण संतांचे विचारच समाजाला उपयुक्त ठरणारे आहेत. उच्च पदावर काम करताना पैसे भरपूर मिळतात; पण समाधान मिळत नाही. पैशामुळे माणसं माणुसकी विसरत आहेत. अशा व्यक्तींचे प्रबोधन केवळ कीर्तनातून होऊ शकते. त्यामुळे कीर्तन शिकतो आहे.'' 

तरुणाई अध्यात्माकडे 
अभिनव कला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त अधीक्षक रोहिणी गोरे म्हणाल्या, ""माझ्या सोबत 25 ते 30 वयातील मुले कीर्तन शिकत आहेत. ते सर्व उच्चशिक्षित आहेत. अध्यात्माची आवड त्यांना आहे. विद्याधर जोशी सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅनेजर आहेत. ऋषिकेश चोरगे बी फार्मसी झालेले आहेत. त्यांच्याशी बोलताना जाणवते की, उच्चशिक्षित पिढी अध्यात्माकडे वळते आहे. चंगळवादापासून दूर जात आहे. हीच समाधानाची बाब आहे. कीर्तनातून संतविचारांचा प्रभाव समाजावर पडतो आहे. त्यातून समाज व तरुण घडणार आहे.'' 

वारकरी आणि नारदीय असे दोनकीर्तन प्रकार शिकविले जात आहेत. चार वर्षांचा हा प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम आहे. संगीत, संस्कृत व मराठी सुभाषिते, व्याकरण शिकविले जाते. प्रात्यक्षिक घेतले जाते. पदवीला समकक्ष हा अभ्यासक्रम आहे. 
- लिंबराज महाराज जाधव, कीर्तन अध्यापक 

Web Title: engineer to turn spiritual in Pimpri