esakal | नारायणगावची कलिंगडे पोहोचली थेट जम्मू - काश्‍मीर बाजारपेठेत 
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon

बाजारपेठेबाबत बारवे म्हणाले की,मी गेल्या दहा वर्षांपासून दुबईला सीताफळांची निर्यात करत आहे.सीताफळाच्या अनुभवामुळे यंदा रमजान सणासाठी दुबईला कलिंगड निर्यात करण्याचे नियोजन केले

नारायणगावची कलिंगडे पोहोचली थेट जम्मू - काश्‍मीर बाजारपेठेत 

sakal_logo
By
गणेश कोरे

पुणे - कोरोना टाळेबंदीत शेतीमालाची पुरवठा साखळी खंडीत झाल्यानंतर अडचणीत आलेले प्रयोगशील शेतकरी अवधूत बारवे यांनी हतबल न होता थेट जम्मू-काश्मीरच्या बाजारपेठेत कलिंगड पाठवले. सध्याच्या काळात कलिंगडास जेथे किलोस चार रुपये दर मिळणे अशक्य होते, तेथे साडेसात रुपये दर मिळवीत त्यांनी एकरी दीड लाखांचा नफा मिळवला. टाळेबंदीतही त्यांनी नवीन बाजारपेठ शोधली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिवरेतर्फे नारायणगाव (ता.जुन्नर,जि.पुणे) येथील अवधूत बारवे यांनी सात एकर क्षेत्रावरील द्राक्षाच्या रूट स्टॅक बागेत आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड केली. या पिकाच्या व्यवस्थापनासाठी एकरी ५० हजार रुपये भांडवली खर्च झाला होता. लॉकडाऊनमुळे व्यापारी उपलब्ध नसल्याने तालुक्‍यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मागील महिन्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बारवे देखील चिंतेत होते. याच दरम्यान बारवे यांना टाळेबंदीत पुरवठा साखळी खंडीत झाल्याने रमजानच्या काळात श्रीनगर, जम्मू-काश्‍मीर भागात फळांची टंचाई असल्याची माहिती समजली. त्यांनी कांदळीचे व्यापारी बाबूलाल पठाण यांच्याद्वारे श्रीनगरमधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. बारवे यांची कलिंगडे चांगल्या दर्जाची असल्याने प्रति किलो साडेसात रुपये या दराने कलिंगडे खरेदीची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली. मागील आठ दिवसांत श्रीनगर येथील व्यापाऱ्यांनी बारवे यांच्या शेतातून सुमारे दोनशे चाळीस टन कलिंगडे खरेदी केली. त्यामुळे बारवे यांचे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान टळले. या कलिंगड विक्रीतून बारवे यांनी खर्च वजा जाता एकरी दीड लाखांचा नफा मिळविला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नवीन बाजारपेठेबाबत बारवे म्हणाले की, मी गेल्या दहा वर्षांपासून दुबईला सीताफळांची निर्यात करत आहे. सीताफळाच्या अनुभवामुळे यंदा मी रमजान सणासाठी दुबईला कलिंगड निर्यात करण्याचे नियोजन केले. यंदा सात एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड देखील केली. यंदा दुबई बाजारपेठेत मला प्रति किलोस १५ ते २० रुपये दर मिळणार होता. मात्र कोरोना टाळेबंदीत निर्यातीसह देशांतर्गत आणि स्थानिक शेतीमाल पुरवठा साखळी खंडीत झाल्यानंतर मोठ्या नुकसानीचा धोका निर्माण झाला. मात्र हताश न होता नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी मी नवीन बाजारपेठ शोधत होतो. विविध मार्गांनी चौकशी करीत मी जम्मू काश्मीर बाजारपेठेत प्रति किलोस साडेसात रुपये दर मिळविला. सध्याच्या परिस्थितीत अपेक्षित फायदा झाला नसला, तरी नुकसान टाळण्यात यशस्वी झालो. परराज्यातील नवीन बाजारपेठ देखील मिळवली. 

संपर्क - अवधूत बारवे, ९८६०३९०१३७