मृत शेतकऱ्याचे यकृत, मूत्राशय दान

पुरुषोत्तम डोरले
रविवार, 29 एप्रिल 2018

अपघात झाला त्या जागेचा पंचनामा नोंदविला आहे. बयाण घेण्याकरिता दवाखान्यात गेलो असताना वासुदेव इंगळे आईसीयूमध्ये असल्यामुळे त्यांचे बयाण घेता आले नाही. पत्नी, भाऊ व नातेवाइकांचे बयाण घेतले. दवाखान्यातून प्रमाणपत्र आल्यानंतर पुढची कार्यवाही करू.
- रमेश दुनेदार, वनरक्षक, मौदा

मौदा - प्रिय व्यक्‍तीचे अचानक अपघाती निधन झाले तर मनाला होणारे दुःख शब्दांतून व्यक्‍त करता येत नाही. परंतु, भावनांना आवर घालून थोडा विचार केला तर ती व्यक्‍ती अवयवाच्या रूपाने आपल्यातच जिवंत राहू शकते. एका शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हा धाडसाचा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. 

शेतकरी वासुदेव पांडुरंग इंगळे हे शेती करून प्रपंच चालवीत होते. मौद्याला एका लग्नाला जात असताना २२ एप्रिलला एनटीपीसी गेटसमोर त्यांच्या दुचाकीला रानडुकर आडवे आले व त्यांचा अपघात झाला. सोबत त्यांचे मित्र शंकर नत्थू चौधरी होते. ते यात किरकोळ जखमी झाले. मात्र, वासुदेव इंगळे यांना जबर मार लागल्यामुळे मौदा येथील एका खासगी दवाखान्यात त्यांना भरती करण्यात आले. प्रकृती चिंताजनक वाटल्यामुळे डॉ. बघे यांनी त्यांना नागपूर येथे न्यू ईरा हॉस्पिटलला भरती करण्यास सांगितले. मृत्यूशी झुंज देत असताना अखेर उपचारादरम्यान २५ एप्रिलला सायंकाळी ६.४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पत्नी, भाऊ व नातेवाइकांनी न्यू ईरा हॉस्पिटलचे डॉ. नीलेश अग्रवाल यांना अवयवदानाचा निर्णय सांगितला. त्यांनी लगेच सूचना दिल्या. एक किडनी ओक्‍हार्ट हॉस्पिटलला व एक किडनी ऑरेंज सिटी हॉस्पिटलला देण्यात आली. यकृत मात्र न्यू ईरा हॉस्पिटलला ठेवण्यात आले.

पत्नी नानूबाई वासुदेव इंगळे, मुलगा आकाश, मुलगी कोमल, नातेवाईक उमेश झलके यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल बारशीचे उपसरपंच चंद्रभान देऊळकर, गजानन हिवसे, हरिचंद इंगळे, शेषराव इंगळे, रमेश करडभाजणे, ईश्‍वर राऊत, रवी दोडके, क्रिष्णाजी बेले, सुरेश हिवसे, हरिशंकर चौधरी, पिंटू दोडके, विठ्ठल चौधरी, दीपक नारनवरे यांनी त्यांच्या निर्णयाला सहकार्य केले.

मरावे परी अवयवरूपी जिवंत राहावे
तालुक्‍यातील बारशी गावातील शेतकरी वासुदेव पांडुरंग इंगळे (वय ४५) रविवारी (ता. २२) यांचा रविवारी (ता. २२) सकाळी १० च्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. पत्नी, भाऊ व नातेवाइकांनी मृत शेतकऱ्याचे मूत्राशय व यकृत दान करण्याचा मोठा निर्णय घेऊन मृतदेह डॉक्‍टरांच्या हवाली केला. नियतीने अचानक केलेल्या आघातानंतर कुटुंबीयांनी मात्र त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडविले. अवयवदान केल्यानंतर ती व्यक्‍ती अवयवरूपाने जिवंत राहू शकते, असा विचार तालुक्‍यातील बारशी गावातील मृत शेतकऱ्याची पत्नी, भाऊ व नातेवाइकांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer vasudev ingale liver kidney donate