फोर्ब्सच्या यादीत मूळची बारामतीकर असलेल्या आर्या तावरेचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arya Taware

मूळची बारामतीकर असलेली व सध्या लंडनस्थित आर्या कल्याण तावरे हिचा फोर्ब्र्ज या आर्थिक बाबींविषयक मासिकात पहिल्या तीस व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.

फोर्ब्सच्या यादीत मूळची बारामतीकर असलेल्या आर्या तावरेचा समावेश

बारामती - मूळची बारामतीकर (Baramati) असलेली व सध्या लंडनस्थित आर्या कल्याण तावरे (Aarya Taware) हिचा फोर्ब्र्ज (Forbes List) या आर्थिक बाबींविषयक मासिकात पहिल्या तीस व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.

मूळची बारामतीची व पुण्यात प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेतलेली आर्या ही बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची कन्या. तिने लंडन विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट अँड फायनान्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या नंतर नोकरी करताना तेथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्याचा अभ्यास करत आर्या हिने स्वताःची स्टार्ट अप कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

निधी उभारणीची अडचण दूर करण्यासाठी तिने क्राऊड फंडींग ही नवीन संकल्पना आणली आणि त्याला यश मिळाले. फ्यूचरब्रीक या नावाने तिने कंपनी सुरु करुन बांधकाम व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज तिच्या हाताखाली ब्रिटीश लोक काम करतात ही अभिमानास्पद बाब आहे.

लंडनमध्ये काम करताना तेथील व्यावसायिकांना ज्या अडचणी येत होत्या निधी कमी पडत होता त्याचा अचूक अभ्यास करुन आर्या हिने फ्यूचरब्रीकच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढला.

युरोपमधील तीस वर्षांखाली प्रभावशाली पहिल्या तीस व्यक्तींमध्ये आर्याला स्थान मिळाले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. बारामतीकर असलेल्या कल्याण तावरे यांनी बांधकाम व्यवसायामध्ये गेल्या काही वर्षात मोठे यश संपादन केलेले आहे, त्यांचे पुणे व परिसरात अनेक बांधकाम प्रकल्प असून आर्या हिनेही वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बांधकाम व्यवसायात मात्र इंग्लंडच्या भूमीवर जाऊन झेंडा रोवला आहे.

इतक्या लहान वयात फोर्ब्स सारख्या मासिकात आर्थिकदृष्टया प्रभावशाली समजल्या जाणा-या जगातील पहिल्या तीस व्यक्तींमध्ये तिचा समावेश होणे ही बाब युवकांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. आशिया खंडातून या यादीत नाव समाविष्ट होणारी ती एकमेव मुलगी आहे.