सगुणा लागवड तंत्रज्ञानाने गडचिरोलीतील १५० शेतकरी झाले समृद्ध

मिलिंद उमरे
Wednesday, 6 September 2017

गडचिरोली - पारंपरिक पद्धतीला फाटा देत मागील दोन वर्षांपासून महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा या कार्यालयाने संयुक्‍त उपक्रम राबवीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सगुणा पद्धतीने धान व अन्य पिकांची लागवड करण्यास प्रेरीत केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील तब्बल ५०० एकर जमिनीवर या पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. या माध्यमातून १५० शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी नांदू लागली आहे. एवढेच नव्हे तर, या शेतकऱ्यांच्या भरघोस पिकाची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली.

गडचिरोली - पारंपरिक पद्धतीला फाटा देत मागील दोन वर्षांपासून महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा या कार्यालयाने संयुक्‍त उपक्रम राबवीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सगुणा पद्धतीने धान व अन्य पिकांची लागवड करण्यास प्रेरीत केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील तब्बल ५०० एकर जमिनीवर या पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. या माध्यमातून १५० शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी नांदू लागली आहे. एवढेच नव्हे तर, या शेतकऱ्यांच्या भरघोस पिकाची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली.

रायगडचे डॉ. भारसाकळे यांनी शोधलेली सगुणा पद्धती शेतकऱ्यांना नांगरणी, चिखलणी, तणकाढणी, अशा अनेक कामांचा त्रास वाचविण्यासोबतच मजुरीचा खर्च कमी करणारी आहे. या पद्धतीत धानाच्या शेतात नांगरणी, चिखलणी करण्याऐवजी वाफे तयार करायचे असतात. विशेष म्हणजे, हे वाफे एकदा तयार केले की, पुढे १५ वर्षे उपयोगात येतात. त्यामुळे हा खर्च एकदाच होतो. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या टोकन साच्याद्वारे वाफ्यात २५ बाय २५ सेमी अंतरावर छेद देऊन त्यात बियाण्यांची पेरणी करावी लागते. त्यामुळे नांगरणी, चिखलणी, रोवणीची गरजच पडत नसल्याने प्रचंड खर्च वाचतो. मात्र, ही पेरणी जून ते जुलै महिन्यात करणे आवश्‍यक आहे. पेरणी केल्यावर २४ तासांच्या आत गोल नावाचे तणनाशक फवारावे लागते. त्यानंतर चार रोपांच्या  मध्ये एक युरिया ब्रिकेट (गोळी) एकदाच दाबून ठेवायची. एरवी शेतकऱ्यांना आपल्या शेतात तीनदा युरिया खत द्यावे लागते. पारंपरिक पद्धतीत धानपिकाला २५ ते ३० फुटवे येतात. मात्र, या पद्धतीत ७० ते ९० पर्यंत फुटवे येतात. त्यामुळे स्वाभाविकच उत्पादनात वाढ होते. पिकाच्या कापणीनंतर अवघ्या तीन दिवसांत आपण जमीन दुसऱ्या पिकाच्या लागवडीसाठी तयार करू शकतो. 

देसाईगंज तालुक्‍यातील कोंढाळा येथील इंदिरा वासुदेव दोनाडकर यांनी पतीकडे सगुणा पद्धतीने शेती करण्याचा हट्ट धरला. मात्र, त्यांच्या पतीचा यावर विश्‍वास नव्हता. त्यामुळे त्यांनी पत्नीला कसलेली शेती न देता बाजूची पडीक जमीन प्रयोगासाठी दिली. इंदिरा दोनाडकर यांनी याच  जमिनीत सगुणा पद्धतीने धानपीक घेतले. त्यानंतर हरभरा आणि मुगाचे पीक घेतले. पतीच्या पारंपरिक पद्धतीच्या कसलेल्या शेतीपेक्षा त्यांच्या पडीक जमिनीत अधिक उत्पन्न मिळाल्याने पतीचाही विश्‍वास बसला आणि त्यांनी आता आपले पूर्ण शेतच या पद्धतीसाठी दिले आहे. या पद्धतीमुळे आरमोरी तालुक्‍यातील गणेशपूरच्या सुषमा नरूले, कुरूंडीमाल येथील वैशाली कन्नाके, कोंढाळा येथील अनिता चौधरी, सुकाळा येथील विलास चौधरी अशा १५० हून अधिक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. भामरागड तालुक्‍यातील बशीर शेख यांनी मागील वर्षी दोन एकरात ही पद्धत वापरली. भामरागड तालुक्‍यातील हलवेर, चेरपल्ली, नवेगाव, धानोरा तालुक्‍यातील येरकड, निमगाव, सालेभट्टी अशा अनेक अतिदुर्गम  गावांतील शेतकरी या पद्धतीने लाभान्वित झाले आहेत. विशेष म्हणजे अनिता चौधरी, विलास चौधरी यांच्या धानपिकाची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली असून, दिल्लीतील आर्या ॲग्रो संस्थेचे प्रतिनिधी त्यांच्या शेतात पाहणी करून गेले आहेत.

‘‘सगुणा पद्धतीत शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. ही अतिशय नैसर्गिक व अत्यल्प खर्चाची पद्धती असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक लाभ मिळतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व आत्मा कार्यालयाची खूप मदत झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघता पुढे उपक्रम अधिक विस्तारणार आहे.’’
- कांता मिश्रा, 
वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadchiroili news farmer Saguna planting technology