मूर्तिदानाची संकल्पना रुजतेय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मूर्तिदानाबाबत....
 काळेवाडी, प्राधिकरण, वाकड, चिंचवडमधून सर्वाधिक मूर्तिदान
 संस्कार, संस्कृती, सद्‌भावना महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचा सहभाग
 डी. वाय. पाटील औषधी महाविद्यालयाच्या ९० जणांचाही समावेश

पिंपरी - गणेशोत्सवानिमित्त शहरातील सामाजिक संघटनांसह महिला बचत गटांच्या वतीने मूर्तिदान संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे चित्र आहे. काही संस्था शाडू मातीपासून मूर्तीच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे पर्यावरण संरक्षणास हातभार लागत आहे. 

सुमारे २३ वर्षांपूर्वी शहरात प्रथम मूर्तिदान उपक्रम सुरू झाला. सुरवातीला या उपक्रमाला प्रतिसाद कमी मिळाला आणि अनेकांनी विरोधही केला. शहरातील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने १९९६ मध्ये मूर्तिदान उपक्रम राबविण्यास सुरवात झाली. या संदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड म्हणाले, ‘‘पहिल्या वर्षी एक हजार ते बाराशे मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती आणि त्यासाठी वापरलेले रसायनयुक्त रंग यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याबाबत सुरवातीला आम्ही जनजागृती केली. त्याचा चांगला उपयोग झाला.’’

पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांपासून शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविणे शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी बाराशे, तर यंदा ११७० शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले आहे. पालिकेच्या ११७ शाळा, ६३५ खासगी शाळांमधील विद्यार्थी मिळून साडेतीन ते चार लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींचा वापर बंद व्हावा, या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.’’

८०० - २०१८ दीड दिवसाचे मूर्तिदान
२००० - २०१९ दीड दिवसाचे मूर्तिदान
४३,१२३ - २०१८ मध्ये एकूण मूर्तिदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Murti Donate Concept Environment