उकिरड्याचे पालटले रूपडे

अतुल पाटील
मंगळवार, 10 एप्रिल 2018

शतपावली निसर्ग, आरोग्याला हिताची
उद्यानात निसर्ग आणि आरोग्यासाठी हितकारक ठरतील अशी वड, उंबर, पिंपळ, चिंच, कडुनिंब, पाम, रबर, गुलमोहर या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नागरिकांना बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात आले आहेत. परिसर स्वच्छ आणि हिरवागार झाल्याने मोकळा श्‍वास घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.

औरंगाबाद - शहरात कचराप्रश्‍नाने अर्धशतकी गाठल्याने एकीकडे कचराबाद म्हणून हिनविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे एकेकाळी उकिरडा असलेल्या ठिकाणी शतपावली उद्यानाने देवानगरी परिसराचे रूपडेच पालटले आहे. आर्य वैश्‍य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

देवानगरीतील शहानूरमियाँ दर्गा रेल्वे क्रॉसिंगलगत पूर्वी कचऱ्याचे ढीग साचले जात होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. सकाळचे चालणे आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास जाणवत होता. याची दखल घेत रेल्वेच्या सुरक्षा भिंतीलगत सुमारे एक किलोमीटर लांब आणि ३० फूट रुंद जागेवर वैश्‍य समाजाच्या माता कन्यका परमेश्‍वरी यांच्या जयंतीदिनी ५ मे २०१६ मध्ये कामाला सुरवात केली. अवघ्या दोन वर्षांत संस्थेने नगरसेविका शोभाताई बुरांडे, प्रदीप बुरांडे यांच्या साथीने शतपावली उद्यान साकारले आहे. 

कडक उन्हाळ्यातही संस्थेने पाण्याचे नियोजन केल्याने उद्यान अधिकच बहरत आहे. शतपावली उद्यानासाठी शोभाताई बुरांडे, प्रदीप बुरांडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी ब्रह्मानंद चक्‍करवार, आशिष कोडगिरे, सुशील बंडेवार, ज्ञानेश्‍वर तगडपल्लेवार, राजेश चालिकवार, नितीन गुंडेवार, सुहास वट्टमवार, बालाजी कोत्तावार, आशिष लाभशेटवार, शिवकुमार दरबारवार, लक्ष्मीकांत उमरीकर, राजेश पत्तेवार यांनी विशेष योगदान दिले. उद्यान साकारण्यासाठी श्री. संचेती यांनीही मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage place shatpavali udyan development