बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ ची उलाढाल पोचली ३ कोटीवर

बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ ची उलाढाल पोचली ३ कोटीवर

नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील शेतकऱ्यांनी २००८ मध्ये स्थापन केलेल्या ‘ओम निलांजन’ शेतकरी गटाचे तीन वर्षापूर्वी गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर केले. बिजोत्पादनातून सुरवातीला केवळ दीड लाख रुपयाची उलाढाल आता तीन कोटी पर्यंत पोचली आहे. सभासद शेतकऱ्यांचा फायदा विविध उपक्रमातून होत असून, दरवर्षी उत्तम लाभांश दिला जातो.

नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यासह सर्वत्र हरभरा, तूर, गहू, कांदा ही पिके  मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पेरणीच्या हंगामामध्ये उत्तम दर्जाच्या बियाणांची कमतरता भासते. शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील उच्चशिक्षित नितीन पाटील बानकर, ॲड. सयाराम पाटील बानकर, अनिल सोन्याबापू बानकर, सुखदेव लांडे, ॲड. रामेश्वर कुरकुटे, चंद्रशेखर शेटे पाटील यासह  ५१ शेतकरी एकत्र येत २००८ मध्ये ‘आत्मा’ अंतर्गत ओम निरंजन शेतकरी बचत गटाची स्थापना केली. पहिल्या वर्षी गटातील नितीन बानकर, चंद्रशेखर शेटे, संजय शेटे या तीन शेतकऱ्यांनी १० एकरावर गहू बिजोत्पादन घेतले. दिडशे क्विंटल गहू बियाणे उत्पादन झाले. त्यातून गटाची दीड लाख रुपयांची उलाढाल झाली. बाजार भावापेक्षा २० टक्के दर अधिक मिळाल्याने एकरी चार हजार रुपये फायदा झाला. दुसऱ्या वर्षी सोनई, शिंगणापूर भागातील ५० शेतकऱ्यांनी गव्हाचे ५०० क्विंटल बिजोत्पादन घेतले. त्यावर्षी ५ लाखाची उलाढाल झाली. त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच हजार रुपये फायदा झाला. यातून शेतकऱ्यांचा उत्साह वाढत गेला. तीन वर्षापूर्वी या शेतकरी गटाचे  रूपांतर गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये करण्यात आले. आता कंपनीचे नितीन बानकर हे अध्यक्ष आहेत. 

उलाढाल पोचलीवर कोटीवर
गेल्यावर्षी सभासद शेतकऱ्यांनी ३०० ते ३२५ एकरवर विविध पीक वाणाचे सुमारे १८०० क्विंटल बिजोत्पादन घेतले. याशिवाय कांद्याचे तीन टन बिजोत्पादन घेतले. 

हे बियाणे कंपनीतर्फे सरासरी बाजारदरापेक्षा वीस टक्के अधिक दर देत खरेदी केले जाते. यातून मागील वर्षी ६५ लाख रुपये उलाढाल झाली. 

या वर्षी बिजोत्पादनातून यंदा खरिपात कंपनीची सुमारे दीड कोटीची उलाढाल झाली. उद्दिष्ट ३ कोटी रुपयांचे आहे. 

दोन वर्षापासून कंपनीची उलाढाल कोटीपेक्षा अधिक झाली. दरवर्षी साधारण दहा हजाराचा आयकरही भरतात.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बिजोत्पादन व कंसात 
२०१९-२० मधील उलाढाल  

गहू - ६०० क्विंटल (२० लाख रु.) 
हरभरा - ३५० क्विंटल (२८ लाख रु.) 
सोयाबीन - ६५० क्विंटल(५२ लाख रु. ) 
तूर - २०० क्विंटल (४० लाख रु.) 
कांदा - २ टन (७० लाख रु.) 

पाच जिल्ह्यात बियाणे विक्री
शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने बिजोत्पादनाचे प्रमाण वाढले. त्यातून बियाणांच्या विक्रीसाठी अधिक प्रयत्न करावे लागले. म्हणून गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीमधील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाणांच्या विक्रीसाठी नगर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत विक्री व्यवस्था उभारली आहे. त्यासाठी ६ वितरक आणि १ विक्री प्रतिनिधी नियुक्त केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंपनीच्या कामासाठी एक वितरण अधिकारी, एक उत्पादन अधिकारी व चार कर्मचारी नियुक्त केले आहेत.

बियाणे पॅकिंग व अन्य कामांसाठी कायमस्वरूपी ७ ते १० मजुर काम करतात. त्यांना प्रति दिन दोनशे ते तीनशे रुपये मजुरी दिली जाते. 

नुकतेच कंपनीने सुमारे ११ लाख रुपये किमतीचे प्रतवारी यंत्र खरेदी केले आहे. 

बिजोत्पादनासाठी शेतकरी व शेत निवड, माती परिक्षण, बियाणे पुरवठा, खत पुरवठा आदी निकष काटेकोरपणे पाळले जातात. गेल्या बारा वर्षात बिजोत्पादन, कमी खर्चात बियाणे, खतांची उपलब्धता करण्यासोबतच शेतीमालाला दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहे. सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, या हेतूने कंपनी काम करत आहे. 
- नितीन बानकर ,  - ७९७२७२५९७३ 
अध्यक्ष, गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनी.

यंदा हमी दराने पाच हजार क्विंटल तूर, हरभऱ्याची खरेदी केली. त्यामुळे बाजार समित्या बंद व लॉकडाऊनच्या काळात दर कमी असतानाही हमी दराने खरेदी केल्याने प्रती क्विंटल एक हजार रुपयांचा फायदा झाला. आता बिजोत्पादनासोबत शहरातील लोकांना दर्जेदार धान्यविक्रीतूनही सभासदांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
-ॲड. सयाराम बानकर,  - ९१३०८४२२०० 
जेष्ठ संचालक, गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनी.

गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनी 
कंपनीअंतर्गत गावांची संख्या - ११
गावांची नावे - शनी शिंगणापूर, सोनई, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, लोहगाव, झापवाडी, घोडेगाव, चांगोणी, हिंगोणी, खरवंडी, वडाळा, चांदा, महालक्ष्मी हिवरे, तुकाई शिंगवे, करजगाव, निंभरी, शिरेगाव.
शेतकरी सभासद - ९५०. (प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे ९.५ लाख रु. भागभांडवल.)
संचालक - सहा (प्रत्येकी दहा हजार रुपये भाग भांडवल.) 
दर टप्प्यावर वाढ करत आता कंपनीचे भागभांडवल - २५ लाख रुपये. 
कंपनीला बिजोत्पादन, बियाणे विक्री, गोदाम साठवण यातून उत्पन्न मिळते. 
शेतकऱ्यांचे हे बियाणे ‘महापीक’ हा ब्रॅण्डअंतर्गत विकले जाते.
बियाणे विक्री व अन्य उत्पन्नाच्या नफ्यातून सहा ते नऊ टक्के लाभांश वाटप.

बियाणे खरेदीतही आर्थिक बचत 
नगरसह राज्यातील बहुतांश भागात गावरान कांदा बियाणांचा तुटवडा आहे. गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीतील ६ शेतकऱ्यांनी बारा एकर क्षेत्रामध्ये २ टन कांदा बियाणे उत्पादित केले. बियाणाची तीन ते साडेतीन हजार रुपये किलोने विक्री केली. या उपलब्ध बियाणांपैकी ३० टक्के (१ हजार किलो) बियाणे कंपनीतील सभासद शेतकऱ्यांसाठी राखून ठेवले जाते. सहभागी शेतकऱ्यांना कांदा बियाणांची उपलब्धता  सहजतेने होते. सभासदांसाठी दरही कमी (२ हजार ५०० रुपये प्रती किलो) आहे. परिणामी कंपनी सभासद १०० शेतकऱ्यांची प्रत्येकी एक हजार या प्रमाणे  बचतही झाली. याशिवाय सोयाबीन, तूर, हरभरा, गहु बियाणे खरेदीसाठीही सभासदांना वीस टक्क्याची सवलत दिली जाते. यातून दरवर्षी कंपनीतील एकूण सभासदांची बियाणे खरेदीतून सुमारे वीस लाख रुपये आर्थिक बचत होते.

धान्य साठवणूकीतही आर्थिक बचत
कंपनीने सभासदांचे धान्य, कांदा साठवणुकीसाठी साडेतीनशे मेट्रीक टन क्षमतेची दोन गोदामे उभारली आहेत. तेथे सभासदांना माल साठवणूकीसाठी सवलत दिली जाते. शासनाच्या गोदामामध्ये प्रति माह १६ रुपये प्रति क्विंटल दर असताना सभासदाकडून प्रति माह केवळ ८ रुपये घेतले जातात. सभासदांचा दरमहा प्रती क्विंटल आठ रुपये फायदा होतो. 

गेल्या वर्षी कंपनीने नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरु केले. असा खरेदी केलेला १५० टन कांदा शेतकऱ्यांच्या चाळीत साठवला. शेतकऱ्यांना कंपनीने प्रतिकिलो एक रुपया भाडेशुल्क दिले.

(Edited By- Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com