‘त्या चौघींना ताठ मानेनं उभं करायचंय’

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

वारजे माळवाडी - महिला सबलीकरणाचे वारे वाहत असताना एका कुटुंबात चार मुलींच्या जन्मानंतर पाचवा मुलगा पाहिजे म्हणून गर्भचाचणी होते. पाचवे अपत्य ‘ती’ असल्याने गर्भपाताच्या निर्णयात माता व गर्भातील कळी या दोघींचा बळी जातो. उर्वरित चौघींना बेवारस व्हावे लागते. त्यांना कमी लेखले जात असताना एक पुरोगामी विचारांची महिला पुढे येते... त्यांना समाजात ताठ मानेने उभे राहण्यासाठी ती शिक्षण देत असून, त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्या महिलेचे प्रयत्न सुरू आहेत. 

अवैध गर्भपातप्रकरणात परळीच्या डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरस्वतीसह अन्य एका व्यक्‍तीला न्यायालयाने शिक्षा सुनावली. या व्यक्‍तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दांपत्याच्या चारही मुलींपुढे प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यांपैकी शाळेत जाणाऱ्या तिघींना खासदार सुप्रिया सुळे यांनी आठ वर्षांपूर्वी बारामतीला आणले आणि शारदानगरच्या कर्मवीर वसतिगृहात ठेवले. त्यांना मानाने जगता यावे यासाठी सुळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

शुक्रवारी डॉ. मुंडे व इतरांना शिक्षा झाली. या पार्श्‍वभूमीवर खासदार सुळे व त्या तिघी नुकत्याच पुण्यात वारजे येथे एक कार्यक्रमात भेटल्या. तिघींची शाळा, खेळ व कलेतील प्रगती आनंद देणारी आहे. एका बाजूला न्यायालयीन निकालाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली तिघींची भेट आणि त्यांची प्रगती पाहून आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला आईची आठवण, ती नसल्याचे दुःख. अशा परिस्थितीत त्या तिघी, खासदार सुळे यांच्यासह उपस्थित्यांच्या डोळ्यांत 
पाणी आले.

सुळे यांनी या तिघींना आमच्या शाळेत आणले. त्यांना शिक्षण देण्याबरोबरच आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सुळे यांचे लक्ष असतेच, असे शिक्षिका आणि रेक्‍टर शोभा हिरवे यांनी सांगितले.

या तिघींची चौथी बहीण आता मोठी झाल्याने तिलादेखील बारामतीला आणणार आहे. त्यांचे आयुष्य चांगले घडविणे आणि त्यांना कर्तृत्ववान करणे, हे आमचे ध्येय आहे. माझ्या आणि आमच्या संस्थेच्या प्रांजळ प्रयत्नांना यश आले. 
- सुप्रिया सुळे, खासदार 

‘आम्ही आता स्ट्राँग झालोय’
या तिघींपैकी थोरली रोहिणी सहावीला असताना वसतिगृहात गेली होती. ती सध्या अकरावीला आहे. ती खो-खो, कबड्डी खेळते. कथ्थकचीही प्रथम परीक्षा दिली आहे. तेजश्री ही दहावीला असून, तिनेही कथ्थकची प्रथम परीक्षा दिली आहे. दहावीला चांगले मार्क मिळविणार, असा विश्‍वास तिने व्यक्त केला. ऋतुजा नववीत असून तिने हार्मोनियमची परीक्षा दिली आहे. कॅम्पसमध्ये आल्याने प्रगती झाली. आम्ही आता स्ट्राँग झालो आहोत, असे रोहिणीने सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Education Life Supriya Sule Humanity Initiative