#WednesdayMotivation : पोलिसांनी तिला तिच्या मामाकडे केले स्वाधीन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

पायावर उभे राहण्याचे स्वप्न
सहा महिन्यांपूर्वीच संबंधित युवतीच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती हलाखीची आहे. तिची बारावीची परीक्षा आहे. मात्र, आईने तिला कामावर जाण्याचा हट्ट धरल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निश्‍चय करून घर सोडले. नोकरी मिळेल या आशेने ती पुण्यात आली. भोसरी एमआयडीसीत काम मिळेल, असे तिला सांगितल्याने ती भोसरीत आली. दोन टवाळखोरांनी तिचा पाठलाग केल्याने ती भोसरीतील सम्राट अशोकनगरातील वर्दळीच्या ठिकाणी येऊन बसली होती.

भोसरी - येथील सम्राट अशोकनगरात नोकरीच्या आशेने घर सोडून आलेल्या युवतीला येथील सजग नागरिक संजीवनी कांबळे यांच्यामुळे तिच्या मामाकडे सुखरूप सुपूर्त करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

भोसरीतील सम्राट अशोकनगरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय आहे. या कार्यालयाजवळील बाकड्यावर रविवारी (ता. २३) सकाळी अकरा वाजता ही युवती येऊन बसली. काही वेळाने ती कार्यालयात जाऊन बसली. रविवार असल्याने कार्यालयात कोणीही नव्हते. काम असल्याने ती बसली असावी, असा तेथे येणाऱ्यांचा समज झाला. मात्र, सायंकाळी चार वाजले तरी ती कार्यालयातच बसल्याचे पाहून संजीवनी कांबळे यांनी तिची विचारपूस केली. त्या वेळी तिला घाबरलेली पाहून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते राहुल ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधला. ओव्हाळ व सामाजिक कार्यकर्ते हरीश डोळस यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यावर भोसरी पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार एस. आय. बुढे यांनी तिला भोसरी पोलिस स्टेशनला आणले. तेथे तिची चौकशी केल्यावर ती तुळजापूरहून घरातून पळून आल्याचे समजले. पोलिसांनी तिच्या मामाशी संपर्क साधला असता ते हडपसरला लग्नाला आल्याचे समजले. तिचे मामा पोलिस स्टेशनला आल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बनसोडे यांनी तिची व मामाची ओळख पटल्यावर पोलिस प्रक्रिया करून मामाच्या ताब्यात दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl job pune police humanity motivation