खालापूरच्या नारींची वय विसरून गिरनारवर स्वारी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

हे शिखर गाठून कोणत्याही बुकात विक्रमाची नोंद होणार नाही; पण आत्मशक्ती जागवल्याचे समाधान आहे...

खोपोली - सौराष्ट्रातल्या हाडे फोडून काढणाऱ्या थंडीत ‘त्या’ चौघी गिरनार पर्वताच्या पायथ्याला उभ्या होत्या. तब्बल ३,६८३ फूट उंचावर असलेल्या पर्वत शिखरावर त्यांचे डोळे खिळले होते. २० हजार पायऱ्यांची ही मजल. बघता बघता अवघ्या सात तासांत त्यांनी हे शिखर गाठले. खालापूर तालुक्‍यातील या चौघींपैकी एक ५५ वर्षांची, तर तिघींनी वयाची अवघी साठी पार केली आहे!

संकटे, आव्हानांच्या कितीही तटबंदी मार्गात उभ्या राहिल्या, तरी एका ध्येयाने अवघड बुरूज लिलया उतरण्याची हिरकणीची परंपरा या मातीतल्या महिला जोपासत आहेत. फक्त आपली आत्मशक्ती जागृत असणे गरजेचे आहे. याच विचारांतून खालापूर तालुक्‍यातील चौक, कलोते व खालापूर येथील या रणरागिणींनी गुजरातमधील गिरनारचे उंच शिखर गाठले.  शरीर साथ देत नाही; मात्र ‘जय शिवाजी, जय भवानी’ हे शब्दच या महिलावर्गांसाठी प्रेरणादायक ठरले. गिरनारवरील दत्त मंदिरात दर्शन घेऊन अनेकजण परत येतात. आपण मात्र या पर्वताच्या उंच शिखरावरती जायचेच, या विचारातून त्यांनी २० हजार पायरी चढून हा पर्वत पार केला. हे आव्हान पूर्ण करणाऱ्या माणिक मिसाळ (६२), लक्ष्मी अतिग्रे (६५), शेवंती पाटील (६२), बेबी बोराडे (५५) या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो, ते कधीही पराजित होत नाहीत. कारण अपयश हे त्यांना माहितीच नसते. आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो!
- माणिक मिसाळ, लक्ष्मी अतिग्रे, शेवंती पाटील, बेबी बोराडे, खालापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girnar mountain

टॅग्स