गड्डा जत्रा अन्‌ रूसलेले आई-बाबा

संजय पाठक
Friday, 7 February 2020

आपला आनंद आपणच शोधायला शिका. दुःखाचे क्षण चालून येतात, आनंदाचे आपल्याला शोधायचे असतात. या वाक्‍या सरशी त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला, किंचतसे स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. बहुधा त्यांना स्माईलचा पासवर्ड सापडला असावा. 

स्माईलचा पासवर्ड 

मी नातेवाइकांकडे गेलो होतो. मोठ्या बंगल्यात नवरा-बायको दोघंच असतात. एकुलता मुलगा अमेरिकेत असतो. तो दरवर्षी ख्रिसमसच्या सुटीदरम्यान तब्बल महिनाभर सुटी टाकून सोलापुरात सहकुटुंब येतो. त्याची दोन्ही मुलं, बायको यामुळे सोलापुरातील त्यांच्या घरात आनंदी माहोल असतो. परंतु यंदा त्याने कळवलं की यायला जमणार नाही. 

झालं... यामुळे आई-बाबांचा मूडच गेला, निराश झाले, जेवण जाईना त्यांना. जीवनातील त्यांचा उत्साह कमी झाला. दुःखी, कष्टी मनानं ते दोघं अक्षरशः दिवस कंठत होते. ते दोघे पहिल्यांदा मुलाच्या न येण्याविषयी नाराजीनं बोलत होते, परंतु हळूहळू त्याची ही नाराजी संतापाच्या पट्टीत गेली. वर्षात काही दिवस त्यांचा सहवास मिळतो, नातवंडांशी मनसोक्त खेळायला, भांडायला मिळतं, त्यांच्यामुळं गड्ड्यावर जाऊन आमच्याही बालपणीच्या आठवणी ताज्या होतात, तेवढासा आनंद आम्हाला पुढील जानेवारीपर्यंत, गड्ड्यापर्यंत पुरतो. पण आता तो यायचं टाळतो. नकोयत आम्ही त्याला, तर मग आम्ही तरी त्याच्या गळ्यात का पडावं. त्यापेक्षा संपवूनच टाकतो नं आमचं जीवनं. आजोबांच्या या वाक्‍यासरशी माझ्या अंगावर सर्रर्रकन काटाच आला. 
दुसऱ्याक्षणी मी बोलायला सुरू केलं. तुम्हीच त्याला शिकवलं, मोठ्ठं केलं. "आकाशी झेप घे रे...' म्हणत परदेशात जायला उद्युक्त केलंत अन्‌ आता त्याच्याविषयी हे असले विचार. त्याला जेव्हा अमेरिकेतून नोकरीचा कॉल आला तेव्हा तुम्हा दोघांना काय म्हणून आनंद झाला होता, आठवतयं... मग तो आनंद आता कुठं गेला...? 

अहो, दोघांपुरतचं हे तुमचं विश्‍व तुम्ही जरा व्यापक करा. अनाथ मुलांच्या आश्रमात जा. तिथल्या चिमुकल्यांशी गप्पा मारा. आपलीच नातवंडे म्हणून त्यांना बिलगा. सोलापुरात बालकामगारांच्या खूप शाळा आहेत, तिथं एखादा दिवस घालवा. वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या आयुष्यात रंग भरा. अहो हे स्वतःला संपविण्याचे तुमचे हे विचार शुद्ध भेकडपणाचेत. तुम्ही एकटे जरूर आहात पण एकाकी नाहीत. काळानुरूप जगण्याची रित बदला. आपला आनंद आपणच शोधायला शिका. दुःखाचे क्षण चालून येतात, आनंदाचे आपल्याला शोधायचे असतात. तुमच्या मुलाला खरंच काही अडचणी असतील, असा विचार करा नां. जरा त्याच्याही भूमिकेत शिरून पाहा. या वाक्‍या सरशी त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला, किंचतसे स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. बहुधा त्यांना स्माईलचा पासवर्ड सापडला असावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grieving parents