रात्रीच्या गर्भात माणुसकीचा उष:काल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पदपथावरील वृद्ध वारकऱ्याला जीवदान; तरुणासह ‘सकाळ’ प्रतिनिधीची संवेदनशीलता

हडपसर - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीतील आजारी वृद्ध वारकरी रात्री थंडीने कुडकुडत पदपथावर पडलेला होता. त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. खोकून खोकून तो वारकरी थकला होता. त्याचे सामानही चोरीला गेल्याने त्याच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे तो हतबल होता; परंतु एका तरुणाने त्यांना पाहिले आणि ‘सकाळ’च्या प्रतिनिधीसोबत या वारकऱ्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात माणुसकीचा उष:काल झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

भेकराईनगर येथील अमृत बिरबळे (मूळ रा. भूम, जि. उस्मानाबाद), स्थानिक पत्रकार चंद्रशेखर भांगे, हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश उमरे आणि ‘सकाळ’च्या प्रतिनिधीच्या अनोख्या संवेदनशीलतेमुळे त्या वारकऱ्याला जीवदान मिळाले आहे. सासवड रस्त्यावरील एसटीच्या थांब्याशेजारी ही घटना घडली. विष्णू गंगाधर कोलते (वय, ६०, रा. बहिरवाडी, ता. नेवासा, जि. नगर) असे या वारकऱ्याचे नाव आहे.  

हडपसरवरून रात्री घरी जाताना अमृत याला पदपथावर हा वारकरी कुडकुडताना व खोकताना दिसला. अमृतने गाडी थांबवून वारकऱ्याची विचारपूस केली. रात्रीची वेळ, पावसाळी वातावरण, वय आदींमुळे वारकऱ्याची अवस्था नाजूक बनली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने ‘सकाळ’मध्ये काम करणाऱ्या आपल्या आतेभावास मोबाईलवरून याची माहिती दिली. त्याचप्रमाणे घरी जाऊन वारकऱ्याला पांघरण्यासाठी ब्लॅंकेट व पाण्याची बाटली आणली. त्यानंतर, ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने स्थानिक पत्रकार चंद्रशेखर भांगे यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वारकऱ्याकडून त्याचे नाव व गावाची माहिती घेतली. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीसोबत जात असताना जेजुरी येथे चुकामूक झाल्याचे व स्वत:कडील सामान चोरीला गेल्याची माहितीही त्याने दिली. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून वारकऱ्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. 

पोलिसांचीही माणुसकी
भांगे यांनी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षण विष्णू पवार यांना तत्काळ मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्याचप्रमाणे, भांगे यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीसह पोलिस ठाण्यात जाऊन सहायक पोलिस निरीक्षक सतीश उमरे यांनाही या वारकऱ्याविषयी सांगितले. उमरे यांनी नेवासा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फोन करून बहिरवाडी येथे वारकऱ्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याची सूचना केली.

केवळ माणुसकीच्या नात्याने पदपथावर असहाय अवस्थेत पडलेल्या वारकऱ्याला मदत केली. संत गाडगेबाबांनी माणसामध्ये देव पाहण्याची शिकवण दिलेली आहे. 
- अमृत बिरबळे

पोलिसांच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचा जीव सर्वाधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे, एखादी व्यक्ती बेवारस अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांकडून सहकार्य केले जाईल.
- सतीश उमरे, सहायक पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hadapsar news humanity in pune