सायदाला मिळाली तीस वर्षांनंतर मायेची ऊब

दिलीप कुऱ्हाडे 
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

सायदा एक वर्षाची असताना तिची आई हरवली होती. शोध घेऊनही सापडली नसल्याने कुटुंबीयांनी त्या परतण्याची आशा सोडली. पण येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या प्रयत्नामुळे तीस वर्षांनंतर सायदाला आईच्या मायेची ऊब मिळाली.

येरवडा - सायदा एक वर्षाची असताना तिची आई हरवली होती. शोध घेऊनही सापडली नसल्याने कुटुंबीयांनी त्या परतण्याची आशा सोडली. पण येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या प्रयत्नामुळे तीस वर्षांनंतर सायदाला आईच्या मायेची ऊब मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आसाम येथील हमिदा बेगम तीस वर्षांपूर्वी हरविल्या होत्या. रुग्णालयातील औषधोपचार, येथील समाजसेवक व आसाम पोलिसांच्या प्रयत्नातून हमिदा यांना त्यांची मुलगी सायदा सुलतान मिळाली. आईला घेण्यासाठी सायदा आपला मामेभाऊ अलिमुद्दीन यांच्यासह आल्या होत्या. मायलेकीच्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले.

मुलगी सायदा एक वर्षाची असताना हमिदा बेगम उदाली (जि. लंका, रा. आसाम) येथून हरविल्या होत्या. त्या मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर सापडल्या. पोलिसांनी त्यांना १९८९ मध्ये ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. जून २०१९ मध्ये त्यांना येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयसिंह इंगळे, समाजसेवक मारुती दुनगे तेथील रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे हमिदा यांची मानसिकता सुधारत होती. समुपदेशनामध्ये त्या आसाममधील असल्याची जुजबी माहिती दिली. त्यावरून दुनगे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर दुनगे यांनी हमिदा यांचे भाऊ अल्लीमउद्दीन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सवर संवाद साधला. अल्लीमउद्दीन यांनी तीस वर्षांपूर्वी हरविलेल्या बहिणीला ओळखले. त्यांनी तत्काळ भाची सायदा यांच्यासह पुणे गाठले. 

हमिदा यांना पाहताच मुलीचा मायेचा बांध फुटला. सर्वत्र चौकशी केल्यानंतरही हमिदा यांचा शोध लागत नव्हता. रुग्णालयातून बाहेर पडताना नातेवाइकांनी अधीक्षक डॉ. फडणीस व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केवळ मनोरुग्णालयामुळे आपली आई तब्बल तीस वर्षांनी सुस्थितीत मिळाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. या क्षणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू आवरता आले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hamida got their daughter With the efforts of the Assam Police