पाच हजार दिव्यांगांना दिले हसनचाचांनी लढण्याचे बळ

कृष्णकांत कोबल
बुधवार, 22 मे 2019

दर शनिवारी मोफत शिबिर
हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात दर शनिवारी कोपरापासून चार इंच पुढे हात गमाविलेल्या व्यक्तींना मोफत हात बसविण्याचे शिबिर घेतले जात असते. त्यासाठी अशा दिव्यांग व्यक्तींनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्‍लब ऑफ पुणे डाऊनटाऊनने केले आहे. 
संपर्क - ९८९००११८८१

मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात गमाविण्याची वेळ आलेल्या अनेकांना लढण्याचे बळ देण्याचे काम ते करीत आहेत. अशा व्यक्तींसाठी एलन मिडोज कृत्रिम हात फाउंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या हाताला प्रशिक्षण देण्याचे काम चाचा मोफत करीत आहेत. आजपर्यंत देशातील सुमारे पाच हजार हात गमाविलेल्या दिव्यांगांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे.

हसन कासीम शेख (वय ६०) हे मूळचे लातूरजवळील उदगीरचे. एकोणतीस वर्षांपूर्वी मिलमध्ये काम करीत असताना त्यांना आपल्या उजव्या हाताचा पंजा गमवावा लागला. तीन महिने त्यांना घरी बसावे लागले. मिलमध्ये पुन्हा त्यांना कामावर घेतले. मात्र, शक्‍य ते काम होत नसल्याने वरिष्ठांकडून मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे पुन्हा दीडच महिन्यात काम सोडावे लागले.

कुटुंबाची जबाबदारी असल्याने पैसे कमावणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी एका हातात सायकल घेऊन त्यावरून पावविक्रीचा फिरता व्यवसाय सुरू केला. हळूहळू ते एका हाताने सायकल चालवू लागले. सात-आठ वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. दरम्यान, रोजगारासाठी पुण्यात आलेला त्यांचा मुलगा भिंतीवरून पडल्याने त्याच्या पायाला अपघात झाला. त्याच्या मदतीसाठी हसनचाचाचे कुटुंब पुण्यात आले.

येथे आल्यावर त्यांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली. त्याच दरम्यान २०१४ साली त्यांना एलन मिडोज कृत्रिम हाताची माहिती मिळाली. तोही मोफत बसविला जात असल्याचे समजल्यावर त्यांना मोठा आनंद झाला. हा काम करणारा हात बसवून घेतल्यानंतर त्यांच्यात चांगलाच उत्साह भरला. आता आपणही या संस्थेसोबत काम करून अशा हात गमाविलेल्या लोकांची सेवा करायचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी संस्थेसाठी काम करणाऱ्या ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे डाऊनटाऊन’चे सहकारी जितू मेहता, राजेंद्र नहार, ओनी काकजीवाला, रिचर्ड लोबो, प्रदीप मुनोत यांच्याशी चर्चा केली. त्यांनी चाचांना हात बसविल्या जाणाऱ्या दिव्यांगांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली.

हसनचाचा तेव्हापासून आजपर्यंत सुमारे पाच वर्षे अशा व्यक्तींना जिथे शिबिर आयोजित केले जाते; तेथे जाऊन हाताच्या वापराचे प्रशिक्षण देण्याचे काम मोफत करीत आहेत. आजपर्यंत सुमारे पाच हजार व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. या हाताने लिखाण, वैयक्तिक आवराआवर, भोजन, पाणी कसे घ्यावे, याचे प्रशिक्षण ते देत आहेत. याशिवाय प्रशिक्षण देताना या व्यक्तींना न खचता जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याबाबत प्रबोधनही करीत आहेत. त्यांच्या या सेवेमुळे या व्यक्तींमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराचे स्थान निर्माण झाले आहे.

माझा हात गेल्याने सुरवातीला मी खचून गेलो होतो. मात्र, एल. एन.-४ कृत्रिम हाताने मला पुन्हा नवे अवकाश प्राप्त करून दिले. त्यामुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. आपणही अशा दिव्यांगांसाठी काम करावे, ही तीव्र भावना निर्माण झाली. त्यांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार केला. त्यातूनच रोटरी क्‍लब ऑफ पुणे डाऊनटाऊनसोबत प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. त्यातून मोठे समाधान मिळत आहे.
- हसनचाचा शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapped Help Hasanchacha Shaikh Motivation