दोन्ही हात नसताना २८ वर्षे वकिली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

पुणे - जन्मतःच दोन्ही हात नाहीत; पण नियतीपुढे ते झुकले नाही. अस्तित्व निर्माण करण्याच्या जिद्देने त्यांनी विधी विद्यालयात प्रवेश घेतला. हातांची कामे पायांनी पूर्ण करून त्यांनी तब्बल २८ वर्षे वकिली केली. एवढेच नव्हे तर नुकतीच नोटरीदेखील मिळवली. 

पुणे - जन्मतःच दोन्ही हात नाहीत; पण नियतीपुढे ते झुकले नाही. अस्तित्व निर्माण करण्याच्या जिद्देने त्यांनी विधी विद्यालयात प्रवेश घेतला. हातांची कामे पायांनी पूर्ण करून त्यांनी तब्बल २८ वर्षे वकिली केली. एवढेच नव्हे तर नुकतीच नोटरीदेखील मिळवली. 

जयंत इरण्णा गाजुल, असे त्या वकिलाचे नाव आहे. गरोदर असताना त्यांच्या आईवर चुकीचे उपचार झाले होते. यामुळे ॲड. गाजुल यांच्या हातांची वाढच झाली नाही. जेवण, लिखाण, दाढी, चित्र काढणे अशा दैनंदिन बाबी ते पायानेच करतात. मुलाने वकिली क्षेत्रात काम करावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी विधी शाखेत प्रवेश घेतला. ११९१ पासून प्रॅक्‍टिस सुरू केली. हात नसलेला हा वकील खटले चालवतो, यावर सुरवातीला कोणाचा विश्‍वासच बसत नव्हता. मात्र हळूहळू खटले मिळत गेले, अशी माहिती ॲड. गाजुल यांनी दिली.

५५ वर्षे पार केलेले ॲड. गाजुल रास्ता पेठेत राहतात. त्यांना दोन मुले आहे. ॲड. गाजुल हे प्रामुख्याने धनादेश न वटल्याचे खटले चालवितात. युक्तिवाद करताना काही अडचण आल्यास सहकारी त्यांना मदत करतात. पण खटल्याचे सर्व काम स्वतः करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बरीच कामे पायाने करत असल्याने वयोमानानुसार मणक्‍यांचा त्रास होत असल्याने त्यांनी २०१४ मध्ये नोटरीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी त्यांना मुलाखतीसाठी बोलविले होते. 

ते नोटरीची कामे करू शकतात यांची खात्री पटल्यावर व मुलाखत झाल्यानंतर त्यांची निवड करण्यात आली. दोन्ही हात नसल्याने नोटरी मिळवलेली ॲड. गाजुल हे पहिलेच वकील असावेत. त्यांचे हे यश इतरांसाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्‍वास पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केला.

सर्व श्रेय कुटुंबीयांना 
काहीतरी करून दाखविण्याची कितीही इच्छा असली तरी कुटुंबीयांच्या मदतीशिवाय ते शक्‍य नाही. हात नाहीत म्हणून घरच्या व्यक्तींनी माझ्याकडे दुर्लक्ष केले असते, तर मी वकिली करू शकलो नसतो. माझ्या या प्रवासात मित्रांचादेखील मोठा वाटा आहे. नोटरीमुळे माझ्या कुटुंबावर आलेले आर्थिक संकट टळले आहे, अशी भावना ॲड. गाजुल यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapped Lawyer Jayant Gajul Success Motivation

टॅग्स