
ओळख सोबत ठेवा
प्रत्येकाने घरातून बाहेर पडताना आपले नाव, पत्ता व जवळच्या व्यक्तींचा संपर्क क्रमांक, ओळखपत्र जवळ बाळगायला हवे. आपत्कालीनप्रसंगी संपर्क साधायला त्यामुळे मदत होते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पौड रस्ता - एकीकडे सोशल मीडियाचा अतिरेक होत असल्याची बोंब केली जात असताना त्याचा वापर करून युवकांनी एका आजोबांना त्यांचे घर शोधण्यास मदत केली. विशेष म्हणजे आजोबांच्या केरळमधील नातवाचे नाव पार्थ खेर आहे. त्याला शोधण्यात पार्थ खरे याने मदत केली. नावातील या साधर्म्याबद्दल आश्चर्य, योगायोगाची चर्चा परिसरात रंगली.
कोथरूडला असलेल्या मुलीकडे राहायला आलेले आजोबा शतपावलीसाठी घराबाहेर पडले. तात्पुरता स्मृतिभ्रंश झाला आणि आपल्या मुलीचे घर कुठे आहे हेच विसरले. त्यांची मनोअवस्था ओळखून एका विद्यार्थ्याने त्यांची चौकशी केली. निलकंठ सोसायटीमध्ये माझी मुलगी आहे, तिच्याकडे जायचे आहे, असे आजोबा सांगत होते. विद्यार्थ्याने सोसायटीतील गोडबोले आजोबांकडे त्यांना नेले. तोपर्यंत त्याच्या मित्रांनी व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर आजोबांचा फोटो टाकून त्यांचे घर शोधण्याचे काम सुरू केले होते.
निलकंठ सोसायटी कोठे आहे? याचा गुगलवर शोध घेतला असता चार जागी या नावाच्या सोसायट्या असल्याचे मुलांना दिसते. त्यांनी चार ठिकाणी चार मुलांना पाठविले; परंतु आजोबांनी सांगितलेले कुटुंब तिथे नव्हते. इकडे आजोबा अस्वस्थ झाले होते. पोलिसांनीसुद्धा तपास सुरू ठेवला होत. आजोबा हरवल्याची तक्रार कोणत्याच चौकीला आलेली नव्हती. ड्यूटी संपल्यावर ते चौकीवर घरी गेले आणि दुसरे पोलिस आले.
गोडबोलेंनी आजोबांना बोलते केले. त्यामध्ये जावई अभिजित व मुलगी नीलिमा खेर यांचा उल्लेख आला. गुगल सर्चमध्ये या दोघांबद्दल काहीच माहिती येत नव्हती. आजोबांनी आपला नातू पार्थ खेर हा बाहेरगावी असल्याचा उल्लेख केला. मुलांनी पुन्हा शोध केला असता लिंकडेन या सोशल साइटवर त्याचा नंबर मिळाला. केरळला असलेल्या पार्थ खेरशी कोथरूडच्या पोलियांनी संपर्क साधला. आजोबांची ओळख पटली.
आजोबांचे नाव होते हरिश्चंद्र मिरजगावकर. ते माहिती जनसंपर्क संचालनालयात संचालक होते. महाराष्ट्र शासनाकडे ३७ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी पिंपरी-चिंचवड समाचार या वृत्तपत्रात काम करायला सुरवात केली. वयोमानामुळे स्मृती अचानक कमी झाली आणि विस्तारलेल्या कोथरूडमध्ये मुलीचे घर शोधणे आजोबांना अवघड झाले. तोपर्यंत खेर कुटुंबीयाने कोथरूड पोलिसांशी संपर्क केला होता. आजोबा कोथरूडमधील माधवबाग सोसायटीत असल्याचे समजले. रात्री साडेअकरा वाजता आजोबा आपल्या मुलीच्या घरी आले.
एकीकडे सोशल मीडियाचा अतिरेक होत असल्याची बोंब केली जात असताना त्याचा वापर करून युवकांनी आजोबांना त्यांचे घर शोधण्यास मदत केली. विशेष म्हणजे आजोबांच्या नातवाचे नाव पार्थ खेर होते, त्याला शोधण्यात पार्थ खरे याने मदत केली. नावातील या साधर्म्याबद्दल आश्चर्य, योगायोगाची चर्चा परिसरात रंगली.