चारा छावण्यांवरील शेतकऱ्यांना मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

  रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या जनावरांना आणि माणसांना दिलासा देण्याच्या भावनेतून शहरातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

पुणे -  रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या जनावरांना आणि माणसांना दिलासा देण्याच्या भावनेतून शहरातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

माण तालुक्‍यातील १८ चारा छावण्यांवर राहत असलेल्या ३,४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य, तर पाच चारा छावण्यांतील ७५० गुरांसाठी पशुखाद्य दिले. माण तालुक्‍यातील आंधळी गावातील चारा छावणीवर हा अन्नधान्यवाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी युवराज ढमाले, वैष्णवी ढमाले, गीता जगताप, दिग्विजय जगताप, निवृत्त उपमुख्याधिकारी टी. आर. गारळे, बलवंत फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंगाडे व शेतकरी बांधव उपस्थित होते. अन्नधान्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ याचा समावेश आहे. युवराज ढमाले म्हणाले, ‘‘दुष्काळनिवारणासाठी शासन काम करीत आहेच. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा उपक्रम घेतला. दुष्काळी भागातील या लोकांसाठी आणि जनावरांसाठी मला मदत करता आली, याचे समाधान आहे.’’ 

मामूशेठ वीरकर म्हणाले, ‘‘शासन आपल्या परीने मदत करीत आहे. पण, ढमाले यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींनी शेतकऱ्यांना मदत केल्याने दुष्काळाचा सामना करण्याचे बळ त्यांना मिळाले आहे. ढमाले यांच्या मदतीमुळे या शेतकऱ्यांना दोन वेळचे चांगले जेवण मिळणार असून, गुरांनाही सकस खाद्य मिळणार आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping farmers on fodder camps