पाडळी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम; पाच झाडे लावणाऱ्यांची घरपट्टी माफ

गजानन गिरी
मंगळवार, 16 जुलै 2019

पर्यावरणाला संतुलितपणा यावा या उद्देशाने वृक्षमित्र योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेतील सहभागांना घरपट्टीसह वर्षभर दाखलेही मोफत मिळणार. त्यांची घरपट्टी मी स्वतः भरणार.
- सुरेखा जाधव, सरपंच, पाडळी ग्रामपंचायत

मसूर - शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पाडळी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा जाधव यांनी यासाठी वृक्षमित्र योजना योजनेत हाती घेतली असून, त्यात सहभागींनी पाच झाडे लावून वर्षभर त्यांचे संगोपन करणाऱ्या कुटुंबांची वर्षभरची घरपट्टी स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आहे. तद्वत या कुटुंबाला ग्रामपंचायतीतून वर्षभर सर्व प्रकारचे दाखले मोफत देण्यात येणार आहेत. सहभागासाठी २० जुलैपर्यंत मुदत दिली आहे. 

कऱ्हाड तालुक्‍याच्या अंतिम टोकावर पाच हजार लोकसंख्येच्या पाडळी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच टाहो फोडावा लागतो. गेल्या काही वर्षांत पाऊसमान कमी झाल्याने गावची पाण्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशी स्थिती कायम राहिल्यास पाडळीचे भवितव्य संकटात येईल याची जाणीव सरपंच जाधव यांना झाल्याने त्यांनी हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. पाडळीतील प्रत्येक कुटुंबाने पाच झाडे लावावीत. त्यांचे संगोपन करावे.

लावलेल्या पाच झाडांची, वर्षभर संगोपन केल्याची नोंद स्वतः सरपंच घेणार आहेत. लावलेली पाच झाडे वर्षभर जगवली, तर त्यांची वर्षभराची घरपट्टी माफ केली जाणार आहे. मात्र, माफ केलेल्या घरपट्टीचा आर्थिक भुर्दंड ग्रामपंचायतीला बसू नये म्हणून या घरपट्टीची रक्कम स्वतः सरपंच भरणार आहेत.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरपंचांनी राबवलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला त्यांनी ‘ग्रामपंचायत पाडळी वृक्षमित्र योजना’ असे नाव दिले असल्याचे सांगितले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एखाद्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असेल तर त्यांना लावण्यासाठी लागणारी पाच झाडेही आम्ही स्वखर्चाने उपलब्ध करून देऊ, असेही असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House Tax Free for Five Tree Plantation Padli Grampanchyat