‘महावीर की रोटी’तून भागतेय पोटाची भूक

दीपेश सुराणा 
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर सध्या दर रविवारी दुपारी बारा वाजता या उपक्रमांतर्गत अन्नदान केले जात आहे. त्याचा फायदा दर रविवारी २५० ते ३०० रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना होत आहे. सुरवातीला दोन महिने हा उपक्रम चिंचवडगावातील चापेकर चौकात घेण्यात आला. सप्टेंबर २०१८ पासून चव्हाण रुग्णालयासमोर हा उपक्रम सुरू आहे. 

पिंपरी - जैन समाजाच्या वतीने शहरात गेल्या आठ महिन्यांपासून तीन ठिकाणी गरीब आणि गरजू नागरिकांसाठी ‘महावीर की रोटी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत दोन ठिकाणी दर रविवारी तर, एका ठिकाणी दर शनिवारी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरीब आणि गरजू व्यक्तींना एक वेळचे मोफत जेवण दिले जात आहे. या उपक्रमातून एकप्रकारे सामाजिक बांधिलकीचा सेतूच जोडला  जात आहे. 

जैन साधू चंद्रप्रभजी आणि ललितप्रभजी यांनी दिलेल्या प्रेरणेतून या उपक्रमाला जुलै २०१८ पासून सुरवात झाली. चिंचवडगावमधील सकल जैन समाजाच्या वतीने पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर सध्या दर रविवारी दुपारी बारा वाजता या उपक्रमांतर्गत अन्नदान केले जात आहे. त्याचा फायदा दर रविवारी २५० ते ३०० रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना होत आहे. सुरवातीला दोन महिने हा उपक्रम चिंचवडगावातील चापेकर चौकात घेण्यात आला. सप्टेंबर २०१८ पासून चव्हाण रुग्णालयासमोर हा उपक्रम सुरू आहे. 

थेरगावातील सकल जैन समाजाच्या वतीने सुरवातीला थेरगाव-वाकड रस्ता येथील थेरगाव स्थानकाजवळ दर रविवारी दुपारी एक वाजता हा उपक्रम राबविण्यात येत होता. तीन ते चार महिन्यांनंतर त्याचे स्थळ बदलले. सध्या हा उपक्रम थेरगाव स्थानकाजवळील स्पंदन रुग्णालयासमोर सुरू आहे. त्याचा फायदा दर रविवारी १५० ते २०० गरीब आणि गरजू व्यक्तींना होत असल्याचे नितीन चोरडिया यांनी सांगितले. 

चिंचवडस्टेशन येथील जय महावीर विहार सेवातर्फे दर शनिवारी सकाळी अकरा वाजता ‘महावीर की रोटी’ उपक्रमांतर्गत चिंचवड स्टेशन जैन स्थानकाच्या बाजूला अन्नदान केले जात आहे. दर शनिवारी सुमारे तीनशे गरीब व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ होत असल्याची माहिती संतोष लुंकड यांनी दिली. 

चिंचवडगाव सकल जैन समाजातर्फे जैन समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दर रविवारी ‘महावीर की रोटी’ उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम यापुढेदेखील सुरू ठेवणार आहे.
- अजित लुणिया

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jain community initiative Mahavir ki Roti in pimpri

टॅग्स