भाऊ असावा तर असा...

- पांडुरंग बर्गे
Saturday, 4 March 2017

बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे निभावले उत्तरदायित्व 

सातारा - ज्यांनी मदत केली त्यांच्या ऋणातून उतराई होणे किमान त्यांचे आभार मानणे, ही खरी संस्कृती. या संस्कृतीचे दर्शन तसे दुर्लभ झाले आहे. मात्र, बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे उत्तरदायित्व भावाने निभावले आहे. त्याच्या कृतीमुळे ‘भाऊ असावा तर असा...’, अशा भावना सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे निभावले उत्तरदायित्व 

सातारा - ज्यांनी मदत केली त्यांच्या ऋणातून उतराई होणे किमान त्यांचे आभार मानणे, ही खरी संस्कृती. या संस्कृतीचे दर्शन तसे दुर्लभ झाले आहे. मात्र, बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे उत्तरदायित्व भावाने निभावले आहे. त्याच्या कृतीमुळे ‘भाऊ असावा तर असा...’, अशा भावना सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

मेढा येथे राहणाऱ्या शांताबाई वाघदरे या वाई नगरपालिका शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचे पती गोविंद वाघदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. दोघेही निवृत्त झाले. निवृत्तीचे समाधानी जीवन ते जगत होते. सर्व सुरळीत सुरू असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. पती निधनानंतर नियमानुसार स्वतःची आणि पतीची सेवानिवृत्ती पेन्शन महागाईसह शांताबाईंना मिळू लागली. मात्र, काही दिवसांनी शिक्षण विभागाने त्यांना एका पत्राद्वारे पतीच्या पेन्शनद्वारे मिळणारी महागाईची रक्कम त्यांना देता येणार नाही. एकाच व्यक्तीला दोन महागाई घेता येत नाही, असे कळवून तोवर घेतलेली महागाईची रक्कम एक लाख रुपये परत करण्याचे आदेश काढले. अचानक समोर आलेल्या संकटामुळे शांताबाई हादरून गेल्या.

आता लाखभर रुपये कोठून भरायचे, या विचाराने शांताबाई अस्वस्थ झाल्या. अखेर त्यांनी आपले काही सोन्याचे दागिने मोडून महागाईची रक्कम शासनाकडे भरणा केली. मात्र, शांताबाईंची ही कैफियत आणि अस्वस्थता सेवानिवृत्तांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघटनेच्या कानावर गेली. संघटनेने शांताबाईंना मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. शिक्षण विभागात अर्ज, विनंत्या करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना शांताबाईंबाबत शिक्षण विभागाने उचललेले पाऊल नेमके कसे चुकीचे आहे, हे पटवून दिले. त्यामुळे शिक्षण विभागाने ही चूक दुरुस्त करत शांताबाई यांच्याकडून वसूल केलेली रक्कम परत करण्याचा नुकताच निर्णय घेतला. 

या दरम्यानच्या काळात शांताबाई वाघदरे यांचे निधन झाले. शांताबाईंना अपत्य नव्हते. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांनी सिद्धनाथवाडी (ता.वाई) येथील आपला भाऊ महेश दुधाणे यांना ‘सेवानिवृत्त संघटना माझ्यावर झालेला अन्याय दूर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. त्यांचा नक्की आदर सत्कार कर’, असे सांगितले होते. श्री. दुधाणे यांना नुकताच रक्कम परताव्याबाबतचा आदेश मिळाल्यामुळे त्यांनी बहिणीच्या मृत्यूपूर्व इच्छेनुसार सेवानिवृत संघटनेस २१ हजारांचा मदतीचा धनादेश सुपूर्त केला. त्यावर ‘भाऊ असावा तर असा...’, असे म्हणत सेवानिवृत्त संघटनेतील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सेवानिवृत्त संघटनेकडे धनादेश प्रदान
दरम्यान, महेश दुधाणे यांनी आपल्या बहिणीच्या इच्छेनुसार २१ हजारांचा धनादेश सेवानिवृत्त संघटनेच्या महाबळेश्‍वर शाखेचे बा. ग. धनावडे, बा. रा. भिलारे, भि. तु. भिलारे यांच्याकडे दिला. महाबळेश्‍वर शाखेने तो धनादेश संघटनेच्या जिल्हा शाखेचे दादासाहेब जोर्वेकर, बा. दि. बर्गे, बा. कृ. गायकवाड, बा. मा. शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kahi sukhad artical