ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनातून पंचवीस लाख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

फायदेशीर पीक
ड्रॅगन फ्रूट या वनस्पतीला कोणाही रोग होत नाही. त्यामुळे औषध फवारण्याचा खर्च वाचतो. कमी पाण्यात पीक येत असल्याने पाणी बचत होते. फळे मोठ्या आकाराची असल्याने तोडणीचा खर्च कमी असतो. शेतातील गवत काढावे लागत नसल्याने मजुरीचा खर्च वाचतो.

सोमाटणे - बेबडओहोळ येथील मनोज ढमाले यांनी खडकाळ माळरानावर ड्रॅगन फ्रूटची झाडे लावून पंचवीस लाखांचे उत्पादन काढले. 

पावसाळ्यात गवतही न उगवणाऱ्या खडकाळ माळरानावर कोणत्या पिकाची शेती करावयाची हा प्रश्‍न बेबडओहोळ येथील प्रगतिशील शेतकरी मनोज ढमाले यांना पडला होता. दरम्यानच्या काळात थायलंड येथे माळरानावर ड्रॅगन फ्रूट शेती केली जाते, याची माहिती त्यांना मिळाली. यावर सखोल विचार करून त्यांनी ड्रॅगन शेतीचा मार्ग निवडला. त्यांनी थायलंड येथून ड्रॅगन फ्रूटची रोपे आणाली. ती बेबडओहोळ डोंगराजवळील आठ एकर शेतात योग्य आकारचे खड्डे घेऊन लावली. 

ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची वाढ सरळ व जलद होण्यासाठी प्रत्येक रोपाच्या शेजारी आधारासाठी सिमेंट खांब बसवले. शेतात रोपांची लावणी केल्यावर योग्य पद्धतीने रोपांना वेळेवर खतपाणी दिले. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. पिकांची चांगली निगा राखल्याने ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला दीड वर्षात फळे आली. सुरवातीला त्यांना अपेक्षित उत्पादन निघाले नाही; परंतु नंतरच्या काळात या पिकाला चांगले दिवस आले. झाडे मोठी झाल्याने उत्पादनात दुप्पट वाढ झाली. पुणे, मुंबई येथे चांगली बाजारपेठ मिळाल्याने खरेदीदारांची मोठी गर्दी वाढली. परिणामी मागणीही वाढली. सध्या या फळासाठी किलोचा दर पन्नास रुपयांपेक्षा जास्त आहे. 

एका झाडाला वर्षातून दोन वेळा प्रत्येकी शंभर फळे येतात. या फळांच्या विक्रीतून किमान वर्षाला आठ एकर  माळरानावर पंचवीस लाख रुपयांचे वार्षिक उत्पादन मिळते. सध्या फळझाडांना बारा वर्षे पूर्ण झाली असून, आणखी तीन वर्षे या झाडांपासून उत्पादन मिळणार, असे मत मनोज ढमाले यांनी व्यक्त केले आहे. 

Web Title: kahi sukhad Dragon fruit farmer