अनाथ मंगेशच्या लग्नात गाव बनले वऱ्हाडी

धोंडीबा कुंभार
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि प्रामाणिक स्वभाव सर्वांनाच आवडला. या तरुणासाठी मुलगी बघण्यात आली आणि गावानेच वऱ्हाडी बनून या दांपत्याला आशीर्वाद दिले. यासाठी दानशूरांनी मदत केली.

पिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि प्रामाणिक स्वभाव सर्वांनाच आवडला. या तरुणासाठी मुलगी बघण्यात आली आणि गावानेच वऱ्हाडी बनून या दांपत्याला आशीर्वाद दिले. यासाठी दानशूरांनी मदत केली.

दहीहंडी व श्रावण मासानिमित्त मुठा गावात तालमीची महापूजा होती. दहिकाला उत्सव गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये होता. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ काशिनाथ मोहोळ यांच्या पुढाकाराने व उपसरपंच विजय मोहोळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष विकास मोहोळ, मामासाहेब मोहोळ कुस्ती संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहोळ यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगेश पवार याचा विवाह शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पूजा दिलीप धोगंडे या तरुणीशी थाटामाटात झाला. कुणी पोषाख, कुणी कन्यादान, कुणी मंगळसूत्र अशी मदत केली. मुठा येथील ग्रामस्थांनी अनाथ व कष्टाळू तरुणाचा विवाह जमवून माणुसकीचे दर्शन घडविले.
 
मंगेश पवार हा मुलगा गेल्या पाच वर्षांपूर्वी अनाथ म्हणून मुठा गावात आला होता. त्याचे आईवडील कोण, त्याची जात, धर्म कोणता आदींबाबत त्यालाही माहिती नाही; पण काही दिवसांतच गावातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनला. दहीहंडीच्या मुहूर्तावर त्याचा विवाह पूजाशी लावून दिला. गावातील सर्व महिला मंडळी जमल्या. हळदीचा कार्यक्रम, साखरपुड्यानंतर विवाह आला. दुपारी वाजतगाजत भव्य वरात गावातून काढण्यात आली.

येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाने भोजनाची व्यवस्था केली. या वेळी "संत तुकाराम'चे संचालक लक्ष्मण भरेकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मोहोळ, कैलास लांडगे, दिलीप मोहोळ, सुभाष मोहोळ, तानाजी मोहोळ, अमित मोहोळ, अनिल मोहोळ, सागर मोहोळ, पप्पू साळुंखे, शिवाजी साळुंखे, योगेश मोहोळ, दर्शन राऊत उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kahi sukhad pirangut people help to mangesh pawar marriage