जंगल वाचविणाऱ्या कलावतीदेवी

मयूरा बिजले
रविवार, 19 मार्च 2017

अलीकडच्या काळातही आपलं हिरवं माहेर वाचविण्यासाठी पुन्हा प्रयत्न होत आहेत. कलावतीदेवी आणि इतर महिला यासाठी सक्रिय आहेत.

वर्ष १९७०. पर्यावरण रक्षणासाठी हिमालयाच्या पायथ्याशी सामान्यातल्या सामान्य माणसांनी विशेषत स्त्रियांनी, मुलांनी जंगलातील झाडं वाचविण्यासाठी एक अनोखा लढा दिला. ते होतं चिपको आंदोलन. सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट्ट यांनी लोकांमधील जंगलतोडीविरुद्धच्या उद्रेकाला ‘चिपको’च्या माध्यमातून वाट करून दिली होती. गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी अशा अनेक स्त्रिया आपल्या मुलाबाळांसह या आंदोलनात हिरिरीने उतरल्या होत्या. ठेकेदारांच्या मजुरांनी गौरादेवीवर बंदूक रोखली, तरी या बायका हटल्या नाहीत. पोराबाळांसह झाडाला चिपकून राहिल्या. शेवटी मजुरांनीच माघार घेतली. या साऱ्याजणी रस्त्यातच चंडीप्रसाद भट्ट आणि गावकऱ्यांना भेटल्या तेव्हा त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले, ‘‘हमने हमारा मायका बचा लिया है... ’’ अलीकडच्या काळातही आपलं हिरवं माहेर वाचविण्यासाठी पुन्हा प्रयत्न होत आहेत. कलावतीदेवी आणि इतर महिला यासाठी सक्रिय आहेत.

कलावतीदेवी १९८० मध्ये लग्नानंतर बचर या उत्तराखंडात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात राहायला आल्या. चार चौघींप्रमाणे सकाळी घरातली कामे आवरली, की शेतातली कामे करायची, असा त्यांचा नित्यक्रम. एकेदिवशी त्या शेतात गेल्या तर त्यांना जवळच्याच डोंगरांवर विजेचे खांब लागलेले दिसले. चौकशी केल्यावर त्यांना कळाले, की शेजारच्या गावात कुठला तरी सरकारी कार्यक्रम आहे, त्यासाठी लागणारी वीज नेण्यासाठी हे खांब लावले आहेत. कलावतीदेवींच्या लक्षात आले, की गावात वीज आणण्याची हीच वेळ आहे. त्यांनी गावातल्या सगळ्या महिलांना बोलावले आणि सरकारने टाकलेले खांब या महिलांनी उचलून स्वतःच्या गावात आणले. अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी, खांब परत करा नाहीतर कारवाई करू, असे सांगितले. पण त्याचा या महिलांवर काहीच परिणाम झाला नाही. या वेळी महिलांनी थेट अधिकाऱ्यांना सांगितले, आमच्या गावात वीज यायला हवी, तरच हे खांब परत मिळतील. इलाज नसल्याने सरकारी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली आणि गावात वीज आली. कलावतीदेवी यामुळे प्रकाशात आल्या.

एकदा त्या जंगलातून शेताकडे जात होत्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की काही झाडांवर खडूने खुणा केल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी कुठलातरी उपक्रम असेल असे वाटून दुर्लक्ष केले. पण काही दिवसांनंतर ही खुणा केलेली झाडे तोडली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. जंगलात चोरून होणारी ही लाकूडतोड होती. कलावतीदेवींनी महिलांना पुन्हा एकत्र केले. जंगलतोडीला विरोध करायला सुरवात केली. त्या गावातल्या प्रत्येकाला सांगत होत्या, जंगल आहे तर जीवन आहे. जंगलतोड करणाऱ्यांनी गावकऱ्यांना अनेक आमिषे दाखवायला सुरवात केली. पुरुषांना दारू द्यायला सुरवात केली. गावातले पुरुष जंगलतोडीला सरळ सरळ विरोध करत नव्हते. तेव्हा पुन्हा एकदा घरातून आणि जंगलतोड करणाऱ्यांकडून महिलांवर दबाब वाढत होता. पण पहाडी मनोबलाच्या महिला बधल्या नाहीत. कलावतीदेवी महिलांना, पुरुषांना सांगायच्या, की जंगल आणि जंगलातली झाडे आपली लेकरे आहेत. आम्ही या लेकरांना जिवापाड जपणार, कारण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ते गरजेचे आहे. बाई आणि जंगल या समीकरणावर आम्ही विश्वास ठेवतो. जंगल आणि पुरुष यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.

साक्षर नसलेल्या या कलावतीदेवी एका मुलाखतीत म्हणतात, वेळ आणि परिस्थिती तुम्हाला शिकवते. ध्यास घेऊन पुढे जायचे असेल, तर सातत्याने आणि निग्रहाने प्रयत्न करावे लागतात. महिलांच्या मंगल दलाच्या गेल्या तीन दशकांपासून अध्यक्ष असलेल्या कलावतीदेवी म्हणतात, जर जंगल वाचवायचे असेल, गावचा विकास करायचा असेल, तर पंचायत राज कायदा माहिती असणे गरजेचे होते. आम्ही हाच कायदा वापरला. महिलांची एकी, वाढती जनजागृती यामुळे गावच्या वृक्षतोडीला आळा बसला. महिलांचं हिरवं माहेर पुन्हा एकदा वाचलं आणि वाढू लागलं. त्यांच्या या कामाची दखल बीबीसीनंही घेतली. त्याशिवाय कलावतीदेवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वुमन वर्ल्ड समिट फउंडेशनने ‘वुमन क्रिएटिव्हिटी इन रूरल लाइफ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

(लेखिका पर्यावरण अभ्यासक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalavati devi story