आरोग्यदायी मातीच्या भांड्यांना साद

हेमंत पवार
गुरुवार, 22 मार्च 2018

एक महिला व्यवसायासाठी पुढे आल्यावर आणि तिला आर्थिक पाठबळ दिल्यावर ती स्वतःच्या पायावर कुटुंब उभे करू शकते, हे मी माझ्या व्यवसायातून वैष्णवी महिला स्वयंसाह्यता गटाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहे.
- नीता कुंभार

कऱ्हाड - बचत गटाच्या माध्यमातून कुरवड्या, पापड, लोणची एवढ्यावर न थांबता लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने पोषक असलेले काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने तळबीड (ता. कऱ्हाड) येथील नीता संभाजी कुंभार यांनी स्वयंपाकासाठीची मातीची भांडी तयार करण्यास सुरवात केली. भांडी विक्रीसाठी त्याला वैष्णवी महिला स्वयंसाह्यता गटाची जोड दिल्यामुळे अल्पावधीच नावारूपास आलेल्या या व्यवसायामुळे त्यांच्या भांड्यांना राज्यातूनही मागणी वाढू लागली आहे. 

बाजारात जे विकते आणि ज्याला मागणी आहे ते दिल्यास ते विकते, हे नीता कुंभार यांनी स्वनिर्मितीतून दाखवून दिले आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी पती व कुटुंबीयांच्या सहकार्यातून संक्रांती, मडकी, मातीच्या मूर्ती तयार केल्या.

मात्र, त्याला जेमतेमच मागणी व्हायची. तेवढ्यावरच न थांबता आणि बचत गटाच्या कुरवड्या, पापड, लोणची निर्मितीतच न रमता नीताताईंनी जिद्दीच्या जोरावर कष्टाला साद घालत मातीची भांडी तयार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी पैशांची अडचण होती. ती सोडवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यादरम्यान त्यांना महिलांचा बचत गट सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांना कऱ्हाड पंचायत समितीमधील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका समन्वयक नीलेश पवार व विस्तार अधिकारी एस. बी. पवार यांनी सहकार्य केले. त्यांनी वैष्णवी महिला स्वयंसाह्यता गटाची स्थापना केली. त्यानंतर त्यांना व्यवसायासाठी पंतप्रधान रोजगार अंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाने तीन लाखांची कर्ज स्वरूपात मदत केल्याने त्यांनी जिद्दीने व्यवसायात लक्ष घालून स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी तयार कऱण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बाजारपेठेचा आणि मातीची भांडी कशी तयार करायची, याचा अगोदर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी मातीची विविध प्रकारची टिकाऊ आणि आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी तयार करण्यास पती संभाजी कुंभार आणि कुटुंबीयांच्या मदतीने १६ वर्षांपूर्वी सुरवात केली.

सुरवातीला जुनी लोप पावलेली स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरण्याची संकल्पना सध्याच्या काळातील लोकांच्या मनात उतरवताना मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे त्याला मागणी कमी होत होती. मात्र, मातीच्या भांड्याच्या वापराबाबत लोकांमध्ये विविध पातळ्यांवर जागृती करण्यास प्रारंभ झाल्याने आणि मातीच्या भांड्यात भाजी-आमटी व अन्य पदार्थ केल्यामुळे लोह, मॅग्नेशियम व अन्य खनिजे आपोआप मिळतात आणि त्यातील जेवणाला एक वेगळीच चव असते, हे लक्षात येऊ लागल्याने लोकांकडूनही या भांड्यांना मागणी वाढली आहे. त्यांनी गेल्या १६ वर्षांत सुमारे दहा लाखांवर व्यवसाय केला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची माणिनी जत्रा, माणदेशी प्रदर्शन, नक्षत्र प्रदर्शन, ज्योतिर्मय प्रदर्शन यासह कोल्हापूर, पुणे, सांगली, इस्लामपूर येथील शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात भाग घेऊन तेथेही मातीची भांडी पोचवली आहेत. 

नेत्यांनाही भुरळ 
नीताताईंच्या मातीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांची नेत्यांनाही भुरळ पडली आहे. त्यांची भांडी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले,  माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या नेत्यांसह पाटणचे अमरसिंह पाटणकर, ‘माणदेशी’च्या चेतना सिन्हा, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एऱम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व डॉक्‍टरांनी मोठ्या प्रमाणात वापरासाठी नेल्याचेही सौ. कुंभार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karad news soil pot nita kumbhar