कारले बंधूंच्या दातृत्वाने शाळेला नवा लूक

रमजान कराडे
मंगळवार, 16 जुलै 2019

नानीबाई चिखली - मराठी शाळेत शिकून ‘त्या’ बंधूंनी आज उंच भरारी घेतली आहे; मात्र, ही भरारी मातीतील शाळेत शिकून घेतली, याची जाणीव त्यांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून संपूर्ण शाळाच रंगवून दिली. यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षात वाटचाल केलेल्या शाळेचे एकदम रूपडेच पालटले. ज्ञानमंदिरासाठी दातृत्वाची झोळी रिकामी करणाऱ्या या बंधूंची नावे आहेत जॉन कारले व पद्माकर कारले. 

सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेली येथील कुमार विद्यामंदिर शाळा. याच शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना संस्काराचा वसा व शिक्षणाचा ठसा उमटविलेले कारले बंधू नोकरीनिमित्त गेल्या २५ वर्षांपासून अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, ज्यावेळी ते गावी येतात, त्यावेळी गावातील ज्ञानमंदिरांना हमखास भेट देतात.

मार्च महिन्यात गावी आले असताना त्यांनी कुटुंबासमवेत कुमार शाळेला भेट दिली. या वेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ गायकवाड, शिक्षक तसेच सदस्यांची भेट घेतली. या वेळी चालू शैक्षणिक वर्ष हे शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याचे समजले. त्यांनी क्षणातच संपूर्ण शाळा ऑईल पेंटनी रंगवून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाळेच्या १२ खोल्यांचा संपूर्ण बाह्यांग, संरक्षक भिंत, गेट, बोलका व्हरांडा, इमारतीचे खांब रंगवून दिले. यासाठी दीड लाख रुपये खर्च आला. ज्ञान मंदिरासाठी कोणतीही जाहिरात न करता दातृत्वाची झोळी खाली करणारे कारले बंधू पाहिले की अजूनही काही संपले नसल्याची जाणीव होते.

ज्ञान मंदिरासाठी पाऊल पुढेच...
शिक्षणाने व्यक्तीचे आयुष्य बदलते. यावर विश्‍वास असलेल्या कारले बंधूंनी वीस वर्षांपूर्वी गावातील एका हायस्कूलसाठी दीड लाख रुपये खर्च करीत खोली बांधली होती. फेब्रुवारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरच्या रंगकामाचा खर्च उचलला. तसेच येथे दिवाळीनंतर ५० हजारांचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे कामही सुरू करणार आहेत. याशिवाय माध्यमिक शिक्षण घेतलेल्या लवसगाव (जि. नाशिक) शाळेसाठी अडीच लाखाचे कंपाउंड बांधून दिले आहे. ज्ञान मंदिरासाठीची कारले बंधूंची मदत ही आदर्शवत अशीच आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karle brothers donate to school for new look