वेदनांवर कासीमभाईंची मानवतेची फुंकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

सुरुवातीला डॉक्‍टरांच्या लक्षातच आलं नाही की कोणीतरी बाहेरचा माणूस काम करतोय. मामा लोकांपैकीच असावेत, असं वाटायचं. रात्रपाळीला मात्र दिसत नाहीत. चौकशीअंती कासीमभाईंचे सेवाव्रत समजले. 

सांगली - वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आकस्मिक दुर्घटना विभागात गेल्यावर एक अवलिया भेटतो. वय ५५ वर्षे. कासीमभाई जमादार त्यांचं नाव. शासकीय रुग्णालयातील ते कोणी कर्मचारी वा पुरुष रुग्णसेवक नाहीत; पण ‘सिव्हील’च्या भल्यामोठ्या विश्‍वानं त्यांना आणि कासीमभाईंनी सिव्हीलला आपलंस केलंय. अनेक वर्षे ते काम करीत आहेत. तेही विनामोबदला. केवळ सेवाभावी वृत्तीनं.    

सुरुवातीला डॉक्‍टरांच्या लक्षातच आलं नाही की कोणीतरी बाहेरचा माणूस काम करतोय. मामा लोकांपैकीच असावेत, असं वाटायचं. रात्रपाळीला मात्र दिसत नाहीत. चौकशीअंती कासीमभाईंचे सेवाव्रत समजले. 

दिवसभरात कधीही आकस्मिक उपचार विभागात गेलात तर कासीमभाई नक्की दिसणारच. कधी कोणाला वॉर्डचा पत्ता सांगतात. कधी स्ट्रेचर अतिदक्षता विभागाकडे ढकलत नेतात. भाजून लालभडक झालेल्या एखाद्या रुग्णावर हळूवार वस्त्र पांघरतात.

सांगलीचं अवाढव्य सिव्हील नवख्या रुग्ण, नातेवाइकांसाठी भूलभुलैयाच वाटतं. गोंधळलेल्या रुग्णांना कासीमभाई हेरतात. मदत मिळवून देतात. अत्यवस्थाला सराईत रुग्णसेवकासारखं स्ट्रेचरवर घेतात. त्याला त्रास होणार नाही, याची काळजी घेतात. अतिदक्षता विभागात जातात. एकदा रुग्णाला डॉक्‍टरांच्या हाती सोपवलं की सारी दमछाक विसरून जातात. रिचार्ज होऊन परत कॅज्युलिटीत येतात. सेवेसाठी नव्या रुग्णाची त्यांना प्रतीक्षा असते. 

कासीमभाई म्हणाले, ‘फ्लोरिगचा बिझनेस करायचो. आयुष्यात खुप कमावलं. दोन मुलींची लग्नं झाली. आता काम नाही केलं तरी आयुष्य आरामात निघेल इतकी शिल्लक गाठीला बांधली. आराम करायचं ठरवलं. पण एका खुप जवळच्या माणसाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. माझा त्याच्यावर जीव होता.

कदाचित रुग्णवाहीका वेळेवर आली नसेल, स्ट्रेचर ढकलणारा कोणी नसेल, किंवा वेळेत उपचार न झाल्याने त्याने अखेरचा श्‍वास घेतला. या घटनेने मनावर खोलवर जखम झाली. खुपच वाईट वाटलं. मग ठरवलं, रुग्णांसाठी काम करायचं. एके दिवशी कुटुंबियांशी चर्चा केली. व्यवसायातून, कामातून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं.

थेट सिव्हीलमध्ये आलो. तेव्हापासून सिव्हीलची कॅज्युलीटी हीच माझी कर्मभूमी बनलीय. अत्यवस्थ रुग्णांना तातडीची सेवा मिळवून देणे आणि जीव वाचवणं हेच उद्दीष्ट्य ठरवलंय. सिव्हीलमध्ये जे समोर दिसेल, जमेल, आवडेल ते काम करतो. रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला नवी उर्जा देतं’. 

वेदनांनी कळवळणाऱ्या रुग्णांना कासीमभाईंच्या 
रुपाने जणू देवदूतच भेटतो. सिव्हीलमध्ये मानवतेचे अनेक अनुभव येतात; कासीमभाईसारखी माणसे मात्र विरळच आहेत.
- डॉ. विशाल सकटे,
वैद्यकीय अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasimbhai Social work special story