नोकरी सोडून शिक्षिकेने धरली शेतीची कास  

श्रीधर ढगे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पेरू,लिली मत्सशेती सह बहुपीक लागवडीचा पुंडकर दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग 
खामगाव - खामगाव मतदार संघातील  येऊलखेड येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने पेरू,लिलीसह बहुपीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. 

पेरू,लिली मत्सशेती सह बहुपीक लागवडीचा पुंडकर दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग 
खामगाव - खामगाव मतदार संघातील  येऊलखेड येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने पेरू,लिलीसह बहुपीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. 

जलयुक्तअंतर्गत  शेततळं तयार करून खरपानपट्यावर मात केली . शेतात नानाविध पिके तर घेतलीच सोबतच शेततळ्यात मत्सपालनकरत शेतीला जोड धंदा निर्माण केला. विशेष म्हणजे शशीकांत पुंडकर बीए भाग एक उत्तीर्ण असून, सुवर्णा यांचे शिक्षण एमए, बीएड झाले आहे. त्या खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षिका होत्या. मात्र त्यांनी पती शशीकांत हे प्रयोगशील शेतकरी असल्याने सुवर्णाताईंनी नोकरी सोडून  शेतीची कास  धरली आहे. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे... या युक्तीची प्रचिती या दाम्पत्याला पाहून येते. 

जलयुक्त शिवार योजनेंने  येऊलखेड या खारपाणपत्यातील  गावशिवारात नंदनवन फुलले . येथील  सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने फळबाग, फुलपीक शेती, मत्स्यतळी असे अभिनव प्रयोग केले आहेत .याटुं  पुंडकर कुटुंबीयांना रोजगाराची नवी संधी निर्माण करून दिली आहे.शशीकांत यांचे वडील भास्कर भाऊराव पुंडकर हे हाडाचे शेतकरी आहेत ते सुद्या शेतात काम करतात . पुंडकर कुटूंबीय अनेक पिके घेतात, त्यात फुलशेती अत्यल्प खर्चात करतात . येऊलखेड पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर शेगावचे  श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे . मंदिर परिसरातील दुकानदार ही फुले विकत घेतात. लिली ची फुले विकत घेतात.

लिली बारमाही पीक असून त्याला चांगली मागणी आहे . त्यामुळे त्यांनी लिली पीक घेणे सुरु केले आहे . लिलीच्या पिकावर कुठलीही फवारणी करावी लागत नाही. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचादेखील खर्च येत नाही. एक झाड २५ वर्षे टिकते. मूळामध्ये कंद वाढतात. या झाडाची वर्षातून एकदा छाटनी करावी लागते. केवळ शेणखत व पाण्यावर हे पीक येते. ३ ते ५ वर्षांनी कंद काढावे लागतात. बीज म्हणून कंदाची दोन रुपये नगाने लागवडीसाठी विक्रीदेखील होते. त्यातूनही मिळकत होते. साधारण: जून महिन्यात लागवड केली जाते.शिवाय शेततळ्यात मत्स्यबीज टाकून ते मच्छीचे उत्पादन घेत आहेत. आठ बाय सहा अशा अंतर पद्धतीने एका एकरामध्ये ४०० पेरूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. रोप लावल्याचे हे त्यांचे चौथे वर्ष आहे. जून महिन्यामध्ये या झाडांची कटिंग करावी लागते. त्यामुळे झाडांना पेरू मोठ्या प्रमाणावर लगडतात. ऑक्टोबरमध्ये बहार येतो. तेव्हापासूनच पेरूंची विक्री सुरू होते. ३० रुपये किलो या दराने सध्या पेरूची विक्री केली जात आहे. दररोज ७५ किलो पेरू विकला जात आहे. गत वीस दिवसांच्या काळात १५ क्विंटल पेरूची विक्री झाली असून त्या माध्यमातून सुमारे ४५ हजारांचे उत्पन्न झाले आहे. शेतकरी ते ग्राहक अशी ते पेरू विकतात.एकूणच बहुपिके घेतल्याने पुंडकर यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

पुंडकर दाम्पत्यास विविध पुरस्कार 
प्रयोगशील शेतकरी म्हणून पुंडकर ओळखले जातात. शशीकांत पुंडकर उत्तम शेती करत असल्याने त्यांना कृषीरत्न आणि जिल्हा परिषदेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला . त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सुवर्णा यांना उत्कृष्ट शेडनेट शेती केल्याबद्दल रोटरी कृषि दीपस्तंभ व पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा स्त्री शक्तीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने  शेतात कष्ट करून रोजगाराची प्रेरणादायी वाट पुंडकर दाम्पत्याने निर्माण केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khamgaon news After leaving the job, the teacher took the field of agriculture