#MondayMotivation मूत्रपिंड देत आईने दिला मुलाला दुसऱ्यांदा जन्म

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि आधुनिक उपचारांनी ससून सज्ज होत असल्यामुळे या शस्त्रक्रिया करणे शक्‍य होत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहभागामुळे सामान्य रुग्णांना आर्थिक मदत मिळते. अजूनही अशा व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-  डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता

पुणे - आईने पोटच्या गोळ्याला मूत्रपिंड दान करून जणूकाही दुसऱ्यांदा जन्म दिला आहे. ससून रुग्णालयात ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपण झालेला २४ वर्षीय तरुण हा कोल्हापूर येथील रहिवासी असून, त्याच्या ५२ वर्षीय आईने त्याला मूत्रपिंडाचे दान केले.

महाविद्यालयात शिक्षणाऱ्या या तरुणाचे वडील शिपाई म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ससूनमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत प्रत्यारोपण करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखालील डॉक्‍टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अभय सदरे, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. धनेश कामेकर, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. शंकर मुंढे, डॉ. ऋषिकेश कोरे, डॉ. विद्या केळकर, डॉ. योगेश गवळी यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidny donate to son by mother success motivation life saving