तो बनलाय ‘मनोयात्रीं’चा सहयात्री...

युवराज यादव
मंगळवार, 23 जानेवारी 2018

अमित प्रभा वसंत हा अवलिया अशा एक-दोन नव्हे, तर तब्बल दीडशेहून अधिक मनोयात्रींचा सहयात्री बनला आहे. यातील काही जण बरे झाल्यानंतर पुन्हा पळून गेले. अनेकांना कर्जत, रत्नागिरीतील पुनर्वसन केंद्रापर्यंत पोचवता आले, तर त्यातील ५१ जण पूर्ण बरे होऊन आपल्या घरी पोचले आहेत;

कोल्हापूर - आजऱ्याजवळ रस्त्यामध्ये भटकणारा राम भेटोला. त्याच्याशी दोस्ती केली. खाण्या-पिण्याचं आमिष दाखवून त्याला रूमवर आणलं. त्याचे दाढी-केस कापले, स्वच्छ केलं. जेवण केल्यानंतर बाहेर जाण्यासाठी चुळबूळ करणाऱ्या रामला कॉम्प्युटरवर चित्रपट पाहण्यात गुंतवून, त्याच्या पुढील व्यवस्थेची तजवीज केली. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था न झाल्यानं कोल्हापुरातील वीरेंद्र मोरबाळेंनी आपली गाडी काढली. आजरा ते कोल्हापूर बसनं आणि पुढे कारमधून प्रवास सुरू झाला. पुढे साताऱ्याजवळ हायवेशेजारील हॉटेलपाशी बाबूराम नावाचा आणखी एक जण फिरताना दिसतो. त्याच्याशीही दोस्ती करून, त्यालाही तशाच अस्ताव्यस्त केस वाढलेल्या, मळकटलेल्या अवस्थेत गाडीत घेतलं. हा प्रवास कर्जतच्या श्रद्धा पुनर्वसन केंद्रात त्यांना दाखल केल्यानंतर संपतो... मात्र, पुन्हा नव्या मनोयात्रीच्या शोधासाठी...

अमित प्रभा वसंत हा अवलिया अशा एक-दोन नव्हे, तर तब्बल दीडशेहून अधिक मनोयात्रींचा सहयात्री बनला आहे. यातील काही जण बरे झाल्यानंतर पुन्हा पळून गेले. अनेकांना कर्जत, रत्नागिरीतील पुनर्वसन केंद्रापर्यंत पोचवता आले, तर त्यातील ५१ जण पूर्ण बरे होऊन आपल्या घरी पोचले आहेत; अगदी नेपाळपासून केरळपर्यंत. आजराच नव्हे; तर बेळगाव, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापर्यंत असा मनोयात्री असल्याचे कळताच अमित धाव घेतो. त्यांना वेडे, मनोरुग्ण म्हणण्याऐवजी मनोयात्री म्हणा, हा त्याचाच आग्रह. 

लहानपणापासून आपल्या आसपास विपन्नावस्थेत फिरणाऱ्या या लोकांकडे पाहून अमितला मनातून सतत बोचत होते. पुढे कॉलेजमध्ये असताना तो त्यांना खायला देऊ लागला; पण मनात लोकलज्जेची भीती होती. नोकरीत असताना मात्र भीड चेपली. उलट जे या कार्याकडे कुत्सितपणे पाहतात त्यांनाच लाज वाटली पाहिजे, असे म्हणत त्याने मन घट्ट केले. मग या व्रताच्या आड येणाऱ्या मुख्याध्यापकापर्यंतच्या, चांगल्या पगाराच्या सहा नोकऱ्याही सुटल्या. नोकरी, लग्न करीत नाही म्हणून घरही सोडावे लागले. नंतरची तीन वर्षे काय केलं, काय खाल्लं, कसं राहिलो हे आठवतही नाही. स्वत:च्याच जेवणाची भ्रांत असूनही हे व्रत मात्र सुरूच ठेवलं. अलीकडे अनेक लोकांना याबद्दल माहिती झाल्यामुळे काहींचे मदतीचे हात पुढे येत आहेत, सतीश शांतारामसारखे सहकारी लाभत असल्याचे अमित सांगतात. वंचितांना आधार देण्यासाठी अमित प्रभा वसंत यांनी ‘माणुसकी फाउंडेशन’ ही संस्था सुरू केली आहे. त्याद्वारे मनोयात्रींना पुनवर्सन केंद्रापर्यंत पोचवण्याचे काम करणे, जखमी- पशुपक्ष्यांवर उपचार करण्याचे काम सुरू आहे. मात्र भविष्यात असा आपलाच एक सर्वसोयींनीयुक्‍त प्रकल्प उभारण्यासाठी अमित आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जखमी पशुपक्ष्यांवरही अमित उपचार करतात. 

धनगरवाड्यांपासून प्रारंभ
सुरवातीला अमितने आजऱ्यातील धनगरवाड्यांसाठी काम केले. तेथील मुलांना शाळा, औषधोपचार, आधार कार्ड, तसेच प्राथमिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांना संघटित करून संघर्षरत केले. यामुळे मेघोली आणि पेरणोली येथील वाड्यांवर सरकारी योजना पोचल्या, आपल्या समस्यांबाबत ते जागरूक झाल्यानंतर तेथून अंग काढून घेतले. याचवेळी आजरा बसस्थानकावर कलावती ही पहिली पेशंट भेटली. तिला सुरवातीला अंडी-भात देऊ केला, तिला बोलते केले. ती भोजपुरीमध्ये बोलू लागली. तिचे नाव कुरा आहे, असे तिने सांगितले. मात्र मध्येच ती गायब झाली. नंतर सूत गिरणीजवळ आजारी अवस्थेत सापडली. तेथून तिच्यावर उपचार करून अनेक कठीण समस्यांवर मात करीत ‘श्रद्धा’पर्यंत पोचवले. मग ‘माणुसकी फाउंडेशन’च्या माध्यमातून हा प्रवास असाच आजवर सुरू आहे. ‘फेसबुक’वर या मनोयात्रींची कथा वाचून सुरवातीला तोंड फिरवणारे अनेकजण उत्स्फूर्तपणे मदतीचा हात देऊ लागले, सहयात्रीही होऊ लागले आहेत. ही ‘माणुसकी’ची साखळी सोलापूर- पुणे- मुंबईपर्यंत विस्तारली आहे.

मनोरुग्ण नव्हे, मनोयात्री म्हणा!
रस्त्यावर भटकणाऱ्या या व्यक्‍तींना वेडे ठरवण्यापेक्षा त्यांना मनोयात्री म्हणा. कारण सत्ता, संपत्ती, नाती या संघर्षाच्या पल्याड ती पोचलेली असतात. त्यांना भौतिक साधनांची भ्रांत नसते. त्यांची बडबडही असंबद्ध नसते, फक्‍त ती आपल्याला कळत नसते. त्यामुळेच एकाच गाडीत बसलेले तेलंगणाचा शरणप्पा, ओडिशाचा हरिहर आणि कर्नाटकची लक्ष्मी आपापल्या भाषेतून एकमेकांशी दिलखुलास संवाद साधत असतात, असे अमित सांगतो. अलीकडे सवंग प्रसिद्धीसाठी अशा मनोयात्रींवर जबरदस्ती करून, त्यांचे केस कापून, खायला- प्यायला देऊन अनेकजण त्याचे व्हिडिओ फेसबुकवर टाकताना दिसतात. याचा त्यांना त्रासच होतो. त्याऐवजी त्यांच्या कलाने घेत, त्यांच्याशी मैत्री केल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणणे सोपे जाते, असा अमितचा अनुभव आहे. सरकारी पातळीवरही त्यांच्याकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहायला हवे. प्राथमिक पातळीपासून काम व्हायला हवे, असे अमितचे मत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Amit Prabha Vasant special story