अंजनाताईंचा राजगिरा लाडू, अनारसे निर्मितीत हातखंडा

राजकुमार चौगुले
रविवार, 2 जुलै 2017

भिशीच्या आर्थिक देवघेवीतून नुकसान सहन करावे लागले, परंतु खचून न जाता कोल्हापूर शहराजवळील टेंबलाईवाडी येथील सौ. अंजना घाटगे यांनी राजगिरा लाडू आणि अनारसे निर्मितीला सुरवात केली. गुणवत्तेमुळे या उत्पादनांना वाढती मागणी आहे.

भिशीच्या आर्थिक देवघेवीतून नुकसान सहन करावे लागले, परंतु खचून न जाता कोल्हापूर शहराजवळील टेंबलाईवाडी येथील सौ. अंजना घाटगे यांनी राजगिरा लाडू आणि अनारसे निर्मितीला सुरवात केली. गुणवत्तेमुळे या उत्पादनांना वाढती मागणी आहे.

कोल्हापूर शहराजवळील टेंबलाईवाडी येथील लक्ष्मी कॉलनीमध्ये सौ. अंजना विलास घाटगे राहतात. त्यांचे वय ६० वर्षे. त्यांचे पती एका खासगी संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत. मुलगा सतीश हा सहकारी संस्थेचे काम करतो. अंजनाताई या आशिक्षित, त्यांचे पती विलास हे भिशी चालवायचे. यातून अंजनाताईंची परिसरातील महिलांशी ओळख झाली. त्यातील काही महिलांना त्यांनी पैसे दिले. पण भिशी फुटण्याच्या वेळी या महिलांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवत आम्ही पैसे घेतलेच नाहीत असे सांगितले. याची घरी माहिती नव्हती आणि संबंधित महिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचण उभी राहिली. या घटनेचा त्यांना मानसिक धक्का बसला. परंतु, त्यातूनही त्या हळूहळू सावरल्या.

अंजनाताई बनल्या प्रेरणास्थान  
अंजनाताई कुटुंबाचे प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांची सून सौ. सविता ही लाडू आणि अनारसे निर्मितीमध्ये मदत करते, दैनंदिन हिशेबाचेही काम बघते. पती विलास हे बाजारपेठेतून कच्चा माल आणून देतात. मुलगा सतीश हा लाडू आणि अनारसे पॅकेट विक्रेत्यांकडे पोचविण्यास मदत करतो. स्थानिक विक्रेत्यांकडेही त्यांच्या लाडवाची विक्री होते. वाढत्या व्यवसायाचा कुटुंबातील सदस्यांना अभिमान आहे. 

दिल्लीमधील महोत्सवामध्ये सहभाग 
स्वयंसिद्धाच्या संपर्कात असल्याने अंजनाताईंना दिल्लीमध्ये आयोजित महाराष्ट्र महोत्सवात तीन वेळा सामील होण्याची संधी मिळाली. या महोत्सवात त्यांनी केलेली पिठलं-भाकरी, पुरणपोळी, उकडीचे मोदक ग्राहकांना पसंत पडले. महोत्सवात त्यांनी एक पिठलं-भाकरी तब्बल साठ रुपयांना विकली. महाराष्ट्र महोत्सव हा त्यांच्यासाठी मोठा आनंददायी अनुभव होता. या महोत्सवातून त्यांना चांगला नफा झाला, तसेच आत्मविश्‍वासही वाढीस लागला. 

लाह्या भाजण्यापासून सुरवात 
घर बसल्या काहीतरी उद्योग असावा, या उद्देशाने अंजनाताईंनी एका ठिकाणी लाह्या भाजायचे काम सुरू केले. दिवसाचे दहा- वीस रुपये उत्पन्न मिळू लागले. याच दरम्यान त्यांचा परिचय स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांच्याशी झाला. त्यांना अंजनाताईंनी राजगिऱ्याचे लाडू आणि अनारसे तयार करून दाखविले. कांचनताईंनी पसंती देताच स्वयंसिद्धा संस्थेतून त्यांना उत्पादनाची मागणी मिळाली. हा त्यांच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉइंट` ठरला. आत्मविश्‍वास मिळालेल्या अंजनाताईंनी सुरवातीला अगदी थोड्या प्रमाणात राजगिरा लाडू आणि अनारसे तयार करून परिसरात विक्री करण्यास सुरवात केली. कोणत्याही परिस्थिती स्वत:च्या पायावर उभे रहायचे हे ध्येय असल्याने त्यांनी लाडू आणि अनारसे निर्मिती सुरूच ठेवली. स्वत: लक्ष्मीपुरीत चालत जावून कच्चा मालाची खरेदी करणे, दररोज स्वयंसिद्धा संस्थेची संपर्क ठेवणे आदी कामामुळे त्यांचा उत्साह वाढला. कुटुंबातील सदस्यही अंजनाताईंची धडपड पाहून त्यांना मदत करू लागले. व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्यांदा दिवाळीमध्ये पन्नास किलो अनारसांची विक्री केली. यातून काही नफा शिल्लक राहिला.

दररोज शंभर पिशव्या लाडू, एक किलो अनारसे  
 कुटुंबीयांच्या मदतीने अंजनाताई वर्षभर राजगिरा लाडू व अनारसे बनवतात. दररोज शंभर पिशव्या राजगिरा लाडू तयार होतात. एका पिशवीत बारा लाडू असतात. अठरा रुपये प्रमाणे एका पिशवीची विक्री होते. तसेच दररोज एक किलो अनारसे त्या तयार करतात. सरासरी ३२० रुपये प्रति किलो या दराने अनारशांची विक्री होते. या पदार्थांच्या निर्मितीसाठी अंजनाताई सकाळी लवकरच कामास सुरवात करतात. दुपारी काही वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळी उशिरापर्यंत पदार्थ बनविण्याचे काम सुरू असते. आषाढी किंवा उपवास सणांच्या पार्श्‍वभूमीवर राजगिरा लाडूंना चांगली मागणी असते. अशावेळी काही दिवस अगोदर जादा काम करुन लाडवाच्या पिशव्या योग्य वेळेत दुकानदारांपर्यंत पोचविल्या जातात. त्यामुळे दुकानदारांच्याकडून राजगिरा लाडू, अनारशांना वाढती मागणी आहे.

राजगिरा लाडूची स्पेशल चव  
अंजनाताई राजगिरा लाडू, अनारसे निर्मिती करताना गुणवत्तेवर कायम लक्ष देतात. त्यामुळे सातत्याने मागणी वाढत आहे. लाडवासाठी चिक्की गूळ तर अनारशांसाठी साधा गूळ लागतो. ठराविक व्यापाऱ्यांकडून गूळ आणि राजगिऱ्याची खरेदी होते. दर्जेदार कच्चा मालाच्या वापरावर त्यांचा भर आहे. उत्पादनांचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. 

व्यवसायावर चालतो घरखर्च 
दहा वर्षांपूर्वी राजगिऱ्याच्या लाडवाची एक पिशवी पाच रुपयाला विकली जात होती. आज त्याची किंमत अठरा रुपये झाली आहे. तर शंभर रुपये किलो दर असलेले अनारशाची आजची किंमत ३२० रुपये इतकी आहे. या व्यवसायातील उत्पन्नातून त्यांच्या संपूर्ण घराचा खर्च चालतो, काही रक्कम शिल्लकही रहाते, असे अंजनाताई अभिमानाने सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news anjana ghatge