esakal | करिअरबरोबरच दिला लाकडाला सौंदर्याचा साज
sakal

बोलून बातमी शोधा

सुतारकाम करताना सरिता विश्‍वनाथ लोहार.

सुतारकामाचे कौशल्य हणमंतवाडी (ता. करवीर) येथील सरिता विश्‍वनाथ लोहार या उच्चशिक्षित महिलेने आत्मसात केले आहे. निर्जीव लाकडाला सौंदर्याचा साज चढवला जातो. जिद्दीच्या बळावर शिकलेल्या सुतारकामातून त्यांनी पुरुषी वर्चस्व मोडीत काढत महिलाही सुतार काम करू शकतात, असा संदेश दिला आहे.  

करिअरबरोबरच दिला लाकडाला सौंदर्याचा साज

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर - सुतारकाम म्हटले की, वजनदार लाकूड उचलायचे, रंधा मारून गुळगुळीत करायचं, हातोडीचा एकेक घाव पातळीवर घालत खाचा पाडायच्या. लाकडाचा प्रत्येक कोन ९० अंशात एकमेकांशी घट्ट जोडत चौकट तयार करायची, असे लाकूड चौकोनात जोडणारे सुतारकाम पूर्वापार पुरुष वर्गानेच केले. अशा पुरुष सुतारांच्या बरोबरीचे काम करण्याचे सुतारकामाचे कौशल्य हणमंतवाडी (ता. करवीर) येथील सरिता विश्‍वनाथ लोहार या उच्चशिक्षित महिलेने आत्मसात केले आहे. निर्जीव लाकडाला सौंदर्याचा साज चढवला जातो. जिद्दीच्या बळावर शिकलेल्या सुतारकामातून त्यांनी पुरुषी वर्चस्व मोडीत काढत महिलाही सुतार काम करू शकतात, असा संदेश दिला आहे.  

सुतारकाम बहुतांशी पुरुष सुतारच करतात. नव्या काळात विविध क्षेत्रांत महिला पुढे येत आहेत. शिक्षणासोबत अधिकारी व्हायचं, त्यासाठी आणखी अभ्यास केला. तो प्रत्यक्षात आणला. अनेक महिला अधिकारीही बनल्या तसेच स्वप्न घेऊन सरिता याही पदवीधर (बीकॉम) झाल्या. पण नोकरीची वानवा, ससेहोलपट, कोणाच्या तरी हाताखाली काम करावे लागणे, हेच त्यांना पसंत नव्हते. त्यांनी पतीसोबत सुतारकामाचे धडे घेणे सुरू केले. पतीसोबत त्याही सुतारकाम करू लागल्या.

दरवाजाच्या चौकटीचे भले मोठे लाकूड रंधू लागल्या. हातोडीचे घाव पातळीवर घालू लागल्या, टेपने माप टाकू लागल्या. रंधा घासताना लाकडाला आकार येत गेला. ९० अंशाच्या कोनात एकेक चौकट दारे, खिडक्‍या, टेबल, खुर्ची, सोफासेट, पलंग, टीपॉय, कपाट, कपाटाची दारे अशा फर्निचरचे सौंदर्य खुलत गेले. महिलेच्या जन्मजात सौंदर्य दृष्टीतून फर्निचरने लक्षवेधी आकार घेतला. आठवड्यातील चार दिवस सकाळी दहा ते दुपारी पाचपर्यंत काम, दर शनिवारी रोख पगार असे काम सुतार दाम्पत्य करू लागले.  या कामातून आत्मविश्‍वास वाढला. यातून सरिता वहिनी एकट्याच एखाद्या फ्लॅटचे काम, इमारतीचे काम, दुकानगाळ्यातील फर्निचरचे काम करण्याची क्षमता तयार झाल्याचे सांगतात.

महिला सुतारकाम करते म्हणून काहींना कुतूहल वाटते. कोणी प्रोत्साहन देते; तर काही नाक मुरडतात, ‘शिक्षण झालंय तर नोकरी करा’, असे सल्लेही काहींचे असतात. पण सौ. सरिता म्हणतात की, ‘‘शिकून सवरून कुठे तरी पगारासाठी दिवसभर साहेबांची बोलणी खात मन:स्वास्थ्य हरवून घेण्यापेक्षा सुतारकाम बरे. आपल्याला मनपसंत काम करता येते. आपण बनविलेल्या फर्निचरचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रसन्नता देते. तेव्हा सुतारकामही कोणत्याही अधिकाऱ्यांच्या पेक्षा कमी नाही.’’ 

सरिता म्हणाल्या की, ‘‘अधिकारी होणे मला फार कठीण नव्हते. थोड्या जिद्दीने आणखी अभ्यास केला असता तरी मीही अधिकारी झाले असते. पण सुतारकामात फारशा महिला नाहीत. या क्षेत्रात आपण काम केले तर वेगळे काही काम केल्याचा आनंद होईल. त्या बरोबर कष्टाचे व प्रामाणिक काम केले की, त्याचा मिळणारा मोबदलाही शंभर टक्के प्रामाणिक असतो. याचे समाधान दीर्घकाळ लाभते. हेच समाधान माझ्या हाताची ताकद वाढवते आणि पतीची साथ आत्मविश्‍वासाचे बळ देते. त्यावर हातोडीचा एकेक घाव लाकडाला आकार देतो, लाकडावर पातळीने कोरीव नक्षीकाम करतो. तसे निर्जीव लाकडाला सौंदर्याचा साज चढवतो. असे काम लाकडाला नटवते. माझ्या जगण्याला प्रसन्नता समृद्धीची झळाळी देते.’’   

कामाचे कौतुक
सरिता यांनी गेल्या पंधरा वर्षांत अनेक लक्षवेधी सुतार काम केले आहे. त्यांनी बनविलेल्या सुतारकामापैकी पारंपरिक लाकडी दरवाजे, कपाटे, किचन सेट, बैलगाडी, टांगा, दीपस्तंभ असे आहेत. सरिता यांना यशस्वी महिला सुतार कारागीर असा पुरस्कार एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळाला आहे.

loading image