"रायटर' ओंकार सुतारची अशीही समाजसेवा! 

लुमाकांत नलवडे
सोमवार, 12 जून 2017

अंध व्यक्तींचे परीक्षेचे पेपर लिहून माझाही चांगला अभ्यास झाला आहे. भरपूर नॉलेज मिळाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि कायद्याचेही पेपर दिल्यामुळे माझा अभ्यास होत आहे. खरं तर त्यांचे पेपर लिहून मला ऊर्जा मिळते. म्हणूनच मी आनंदाने हे काम करतो. 
- ओंकार सुतार

कोल्हापूर - कोणी वृक्षारोपण करतो, कोणी रुग्णांना फळे वाटप करतो, कोण वृद्धाश्रमाला मदत करतो... या ना त्या पद्धतीने अनेकांची समाजसेवा सुरूच असते. पण एका डोळस तरूणाने अनेक अंध विद्यार्थ्यांच्या परीक्षेत रायटर (लेखनिक) म्हणून काम करून समाजसेवा केली आहे. 

ओंकार वसंत सुतार असे या तरुणाचे नाव. त्याचे वडील वसंत आणि आई वैभवी दोघेही अंध असून अंधशाळेत शिक्षक होते. वसंत सुतार आता निवृत्त झाले आहेत. या दोघांचा चिरंजीव ओंकार हा मात्र डोळस आहे. अंधव्यक्तींना परीक्षेसाठी लेखनिक लागतो हे त्याला इयत्ता चौथी-पाचवीला समजले. आई-वडीलांनीही त्याबाबात त्याला माहिती दिली. त्यामुळे लेखनिक होऊन अंध विद्यार्थ्यांना सहकार्य करायचे हे त्याने ठरविले होते. 

सहावीत असताना तो बाबांना शाळेत सोडून घरी चालत जात असताना सातवीतील एक विद्यार्थी त्याला भेटला. परीक्षा आहे पण लेखनिक नसल्याचे विद्यार्थ्यांने सांगितल्यावर ओंकार त्याचा लेखनिक होण्यासाठी एका पायावर तयार झाला. आणि तो कोणाला काहीच न सांगता थेट शेजारील हायस्कूलमध्ये त्याचा पेपर लिहिण्यास गेला. दरम्यान ओंकार घरी न पोहचल्यामुळे आई-वडील, मित्रमंडळी चिंतेतून त्याचा शोध घेऊ लागले. अखेर साडेतीन-चार तासांनी ओंकार घरी आला. तेव्हा त्याने पेपर देण्यासाठी गेल्याचे सांगितले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. ओंकारने आजपर्यंत पन्नास-साठ जणांचे पेपर दिले आहेत. विशेष म्हणजे लेखनिक म्हणून काम करायचे हे ठरवूनच तो त्याच्या सुट्यांचे नियोजन करतो. आज तो कृषी तंत्रनिकेतन मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे. सातवीपासून आजपर्यंत त्याने अनेक अंधांच्या परीक्षा दिल्या आहेत. सातवीपासून बीए, एलएलबी, एलएलएम, एमए, दहावी, बारावी अशा अनेक परीक्षा त्याने अंधांसाठी दिल्या आहेत. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळीत तो आता "रायटर' या टोपण नावानेच ओळखला जातो. 

सकाळी एमए दुपारी एलएलएमचा पेपर 
ओंकारने काही दिवसापूर्वीच एकाच दिवशी दोन अंधांसाठी परीक्षा दिल्या. त्यामध्ये एक परीक्षा एमएची होती. तर दुसरी परीक्षा एलएलएमची होती. सकाळी मराठी, दुपारी इंग्रजी माध्यमातून त्याने परीक्षा दिली. त्या दिवशीचा आनंद वेगळाच होता असे तो सांगतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news omkar sutar Social work