कॅन्सर आजाराशी झुंजत मिळविली ‘पीएच.डी.’

कॅन्सर आजाराशी झुंजत मिळविली ‘पीएच.डी.’

कोल्हापूर -  सशक्त मन, सशक्त मेंदू आणि निरोगी शरीर सकारात्मकेची ऊर्जा तयार करते. या ऊर्जेतूनच अनेक शिखरे सर करण्यासाठी नवचेतना मिळते. याउलट रोगी शरीर आणि त्यातून मनाला आलेली मरगळ यशाच्या वाटेवर अडथळा आणतात. एखादा जर्जर आजार असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनात अंधकार पसरतो. हा अंधकार कधी कधी एखाद्याचा शेवट करतो. पण, दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर एखाद्या आजारातून मुक्ती मिळविता येते, ही गोष्ट आज दुर्मिळच मानावी लागेल.
कॅन्सरचा आजार आणि त्याच्या वेदना सहन करीत पीएच.डी. तर मिळविलीच; पण सलग चार वर्षे कॅन्सरशी मैत्री करीत सकारात्मक विचारांतून कॅन्सरच्या धोक्‍यातून ते बाहेर पडले. जीवनाच्या अंधकारमय वाटेवर आनंद पेरणाऱ्या आणि ‘जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या’, अशा कृतीतून इतरांना  प्रेरणा देणाऱ्या एका आनंदयात्रीची ही कहाणी.

‘सकाळ’चे उपसंपादक प्रमोद श्रीरंग फरांदे असे त्यांचे नाव. प्रमोद सातारा जिल्ह्यातील आनेवाडीचे. घरात शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसल्याने अनेक टक्केटोणपे खात त्यांनी शिक्षण घेतले. पीएच.डी. करायची, हे ध्येय घेऊन ते कोल्हापुरात आले. पीएच.डी.ला प्रवेश मिळाला आणि दोन वर्षांतच त्यांना मधुमेह झाल्याचे निदान झाले. मधुमेहाशी मैत्री करेपर्यंत २०१४ मध्ये त्यांना पाइल्सचा त्रास सुरू झाला आणि त्यातून आजार बळावत गेला. काही दिवसांतच त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हे समजताच प्रमोद यांची सारे काही संपले, अशी भावना निर्माण झाली. पण, कुटुंबाची जबाबदारी ओळखून काहीही झाले, तरी आपण बरे व्हायचे, असा निर्धार करीत त्यांनी डॉक्‍टरांची ट्रीटमेंट सुरू केली.

रेडिएशन, केमोथेरपी घेतली; मात्र तरीही कॅन्सरची गाठ गेली नाही. प्रमोद व पत्नी भाग्यश्री यांनी अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला आणि उपचारांचा स्वत: मार्ग ठरविला. पंचगव्य थेरपी आणि प्रमोद, भाग्यश्री यांनी स्वत: कॅन्सरची पुस्तके वाचून शोधलेली उपचारपद्धती सुरू केली. कॅन्सरची पुस्तके वाचत स्वत:वर उपचार करीतच पीएच.डी.चे संशोधन प्रमोद यांनी केले. हे सर्व करताना वेगवेगळे त्रास होतेच, मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी संशोधनाचे काम पूर्ण केले.

नुकतीच त्यांना विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विषयातील पीएच.डी. मिळाली. ‘`दीनबंधू`तील नारायण मेघाजी लोखंडे यांची सामाजिक पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. प्रमोद यांना मार्गदर्शक प्रा. डॉ. ओमप्रकाश कलमे, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. सुभाष देसाई आदींचे मार्गदर्शन लाभले. आजकाल मुलांना परीक्षेची भीती घालणाऱ्या आणि परीक्षाकाळात जास्तच काळजी घेणाऱ्या अनेक पालकांना व विद्यार्थ्यांनाही प्रमोद यांची ही कहाणी निश्‍चितच प्रेरणा देत राहील, अशी आहे.

माझ्या आजारात माझे आई, वडील, पत्नी, सासू, सासरे, मित्र परिवार यांची साथ मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी शोधप्रबंधाचे काम करू शकलो. या साऱ्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच.
- प्रमोद फरांदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com