जिगरबाज स्वातीच्या जीवनात उजळल्या "सुवर्ण'वाटा 

(संकलन - दीपक पवार)
सोमवार, 17 जुलै 2017

अंधत्वावर मात करत "ती' जिद्दीनं उभारली होती... अंधारमय जीवनात वाट शोधणाऱ्या "ती'च्यात "कुछ कर दिखाना है' असा बुलंद हौसला होता; म्हणूनच तिने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोळाफेक आणि भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावत तिचे आणि सांगलीचे नाव रोशन केले आहे. तांदळगाव (ता. खानापूर) येथील स्वाती शिवाजी चव्हाण या जिगरबाज खेळाडूची ही प्रेरणादायी कहाणी... 

जन्म आणि मृत्यू कोण्याचाच हाती नाही; पण यशस्वी जगणे आपल्याच हाती असते. अशीच जिगरबाज स्वातीची कहाणी आहे. खानापूर तालुक्‍यातील येरळेकाठावर वसलेले तांदळगाव एक सुंदर गाव. शिवाजी व मंगल यांची स्वाती ही मुलगी. घरात अठारा विश्‍व दारिद्य्र. आई मंगल अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करते. वडील शिवाजी खासगी कारखान्यात काम करतात. काम करावे तेव्हाच त्यांच्या घरची चूल पेटते. अशी तिच्या घरची परिस्थिती. स्वाती नववीला असताना डोळ्याचे ऑपरेशन करताना तिला अंधत्व आलं, ते कायमचं... उर्वरित जीवनात अंधार दाटला; पण शिक्षणाबाबतची आस्था व ओढ लक्षात घेता रामानंदनगरच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे शिक्षक शांतिनाथ मांगले यांनी तिच्यातील आत्मविश्‍वास जागा केला आणि प्रेरणा दिली. पुढे मिरजेच्या पाटोळेसरांनी अंधशाळेत नेले. चिकाटी व कष्टाच्या जोरावर दहावीची परीक्षा ती उत्तीर्ण झाली. 

विट्यातील आदर्श महाविद्यालय व बळवंत महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाली. पदवीसाठी तिने मुंबई गाठली. माटुंगातील रुईया महाविद्यालयात ती सध्या शिकते. डिसेंबर 2014 मध्ये दिल्ली येथे ईब्सा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर अंधांसाठी राष्ट्रीय मैदानी खेळ स्पर्धा झाल्या. महाराष्ट्र संघातून 23 अंध मुला-मुलींनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्वातीने गोळाफेकीमध्ये सुवर्णपदक पटकावले. नेहा पावसकर, नलिन पावसकर, स्नेहल पांढरे, साकेत वाऱ्हतांडे, प्रा. एस. व्ही. लेले, डॉ. पाठक, दादासाहेब गायकवाड, कविता करंबळे यांचे मार्गदर्शन लाभले. नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गोळाफेक व भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवत तिने आपले नाव रोशन केले आहे. अशी एकूण 13 सुवर्णपदके तिने मोठ्या जिद्दीने व चिकाटीने मिळवली आहेत. अंध स्वातीच्या यशाची "डोळस' कहाणी अनेकांना प्रेरणादायी ठरणारीच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news swati chavan blind