रस्त्याकडेला बहरलं आनंदाचं झाड...!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 18 मे 2018

कोल्हापूर - मी रिक्षावाला. उचगावच्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये हेल्पर म्हणूनही काम करतो. सकाळी ड्यूटी असेल, तर पाचनंतर रिक्षा आणि नाईट असेल तर सकाळी रिक्षा काढतो. पाच-सहा वर्षांपूर्वी सहज मनात विचार आला आणि स्वतःच्या आनंदासाठी परिसरात रस्त्याकडेला झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला. आजवर सातशेवर झाडे लावली, पण शंभरावर झाडे जगवू शकलो आणि उन्हाची लाही लाही होत असताना ही झाडं आता साऱ्यांना सावली देत असल्याचा मनस्वी आनंद वाटतो...महेश सीताराम धर्मे यांनी अगदी प्रांजळपणे हा सारा प्रवास उलगडला. 

हल्ली ग्लोबल वॉर्मिंग आणि पाऱ्याने उच्चांक गाठला की वृक्षारोपणाची केवळ चर्चा होते; पण धर्मे यांच्यासारख्या एका सामान्य माणसाने कुठल्याही प्रसिध्दीशिवाय प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला आहे. 

श्री. धर्मे राहायला सदर बाजार परिसरात. पत्नी आणि दोन मुलांसह त्यांचा सुखाचा संसार. पण सदर बाजार परिसरातून पुढे बापट कॅम्पमार्गे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी पंचगंगेत मिसळते. या पाण्याचा सदुपयोग त्यांनी ही झाडं वाढवण्यासाठी केला. त्यांच्या रिक्षात दोन छोट्या बादल्या आणि खुरपं हे साहित्य हमखास असते. झाडं लावण्यासाठी ते स्वतः विविध प्रकारच्या बिया गोळा करतात. त्या घरी नेऊन त्या रुजवतात आणि छोटंसं रोप तयार झालं की ते रस्त्याच्या कडेला नेऊन लावतात. करंजी, कण्हेरी, कडूनिंब अशी विविध प्रकारची झाडं आता सदर बाजार परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठी झाली आहेत. त्याचवेळी शिल्लक असलेल्या जागेवर नवीन रोप लावून ते जगवण्याचाही त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहे. 
ते सांगतात, ‘‘रोप लावून ते मोठ्ठं करणं माझ्या हातात आहे; पण मी त्यासाठी ट्रीगार्ड तयार करू शकत नाही. त्यामुळे लावलेली रोपं बऱ्याचदा जनावरं, शेळ्या खातात; पण तरीही मी हार मानत नाही. त्याच खड्ड्यात पुन्हा नव्याने रोप लावतो.’’ 

वृक्षारोपणाचे फायदे

  •   एक झाड ५० वर्षांत ३५ लाख रुपयांचे वायू प्रदूषण टाळते.
  •   एका वर्षात ३ किलो कार्बनडाय ऑक्‍साईडचा नाश करते.
  •   ४० लाख रुपये किमतीच्या पाण्याचे डिसाइक्‍लिंग करते.
  •   १८ लाख रुपये किमतीची जमिनीची धूप थांबवते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News tree plantation by Mahesh Dharme