बंधाऱ्यांसाठी केला खराब टायर्सचा उपयोग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

देवरूख - भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, यासाठी बांधावयाचे बंधारे टाकाऊ वस्तूंपासून बांधण्याचा प्रयोग सीताराम चाचे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखाणी खुर्दच्या भेलेवाडीत सुरू आहे. ट्रस्टने बंधाऱ्यांसाठी टायर्सचा उपयोग केला आहे. 

देवरूख - भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, यासाठी बांधावयाचे बंधारे टाकाऊ वस्तूंपासून बांधण्याचा प्रयोग सीताराम चाचे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखाणी खुर्दच्या भेलेवाडीत सुरू आहे. ट्रस्टने बंधाऱ्यांसाठी टायर्सचा उपयोग केला आहे. 

लोकसहभागातून सुरू झालेल्या या उपक्रमात चाचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे हे सहकुटुंब ग्रामस्थांसोबत काम करीत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. मुबलक पावसाचे पाणी अडवून ते भूगर्भात जिरवण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. यामध्ये काँक्रिटचे बंधारे, वनराई बंधारे, मातीचे बंधारे बांधून नदी,  नाले, ओढ्यातील पाणी अडवण्यात येत आहे. श्री. चाचेंनी सांगली, ताडोबा अभयारण्य, आनंदवन आदी ठिकाणी भेट देत तेथील अनोख्या बंधाऱ्यांची संकल्पना पाहिली होती. यातूनच आपल्या गावात एक नवीन प्रयोग करण्याची कल्पना त्यांना सुचली. वाडीतील ग्रामस्थांना एकत्र करीत त्यांनी टाकाऊ टायरपासून बंधाऱ्याची संकल्पना मांडली. ग्रामस्थांनीही त्यांना श्रमदानाची जोड देण्याची हमी दिली. यातून भेलेवाडीत आठ दिवसांपूर्वी बंधारा खोदाई सुरू करण्यात आली. जेसीबी व इतर सामानासाठी लागणारा खर्च चाचे ट्रस्टकडून उचलण्यात आला. माती काढणे, टाकाऊ टायर गोळा करणे तसेच अन्य कामात वाडीतील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी हातभार लावण्यास सुरवात केली. काहीकाळ गणेशभाऊ त्यांची पत्नी सौ. अनुपमा, मुलगी तन्वी यांनीही ग्रामस्थांच्या जोडीने श्रमदान केले. 

गेल्या आठ दिवसांत येथे ६० फूट लांब, १५ फूट रुंद आणि १० फूट उंच बंधारा तयार करण्यात आला आहे. पावसाआधी त्याच्यासमोर टायर टाकून त्यामध्ये माती टाकत बांध घालण्याचे काम सध्या सुरू आहे. या बंधाऱ्यामुळे वाडीतील बहुसंख्य विहिरींची पाण्याची पातळी वाढेल असा विश्‍वास चाचेंसह ग्रामस्थांनी व्यक्‍त केला आहे. गावोगावी टाकाऊ टायर्स सहजरीत्या मिळतात, यातूनही बंधारा बांधता येतो हे या प्रयोगाने सिद्ध होणार आहे. टाकाऊतून टिकाऊ हा प्रयोग अनोखा ठरणार आहे. 

पाणलोट समितीचे सहकार्य नाही
असंख्य ग्रामस्थ या लोकहिताच्या कामात सहभागी झाले; मात्र पाणलोटचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. एकानेही इथे येऊन ग्रामस्थ नक्‍की काय करताहेत याची माहिती घेतलेली नाही. शासनाने या सर्वांना नक्‍की कशासाठी नेमले, असा सवाल उपस्थित करून पाणलोटच्या असहकार्याबद्दल चाचेंनी जाहीर नाराजी व्यक्‍त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news tires Use bad tires for bunds