Video : झाडाच्या फांदीच्या फेरवापरातून लॅम्प आणि पणतीचे स्टॅण्ड

लाकडी कलाकृती बनविताना आदिती देवधर.
लाकडी कलाकृती बनविताना आदिती देवधर.

 सलिल आणि आदिती देवधर हे मायलेक सतत नव्या गोष्टी घडवण्यात दंग असतात. त्यांनी सलीलच्या खोलीतील भिंतीवर कार्टून्सची  चित्रं नुकतीच काढली. घराजवळ पडलेल्या झाडाच्या फांदीचा पुनर्वापर करत आदितीने आकर्षक लॅम्प, पणती ठेवायचे स्टॅण्ड व बरंच काही बनवलं. पोषणमूल्य असलेल्या वनस्पती छोट्याशा टोपलीत वाढवल्या आहेत. 

सलीलच्या खोलीतल्या भिंतीवर आता गारफिल्ड (मांजर), ओडी (कुत्रा), नर्मल (गारफिल्डच्या खेळण्यातलं टेडी बेअर) आणि जॉन (गारफिल्डला पाळणारा माणूस) ही कार्टून जगतातील पात्रं राहायला आली आहेत. आधी रंगीत पेन्सिलीने रेखाकृती काढून नंतर त्यात रंगभरण्यात सलिल आणि त्याची आई, आदिती देवधर दंग झाले होते. ही पात्रं आपल्या हातांनी साकार करण्यातली मौज या दोघांनी पुरेपूर अनुभवली.

आदिती ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करायची. काही वर्षांपूर्वी तिनं नोकरी न करता घरूनच या क्षेत्रातील काम करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सलीलला वाढीच्या वयात आईचा भरपूर सहवास मिळाला. आदितीने नदी संरक्षण, संवर्धन, पर्यावरणरक्षण आदी संदर्भात भरीव पावलं उचलली. जीवित नदी या प्रकल्पांतर्गत तिनं स्वत:ला झोकून देत अनेकांना यात सक्रिय व्हायला उद्युक्त केलं. शहरातील मोठ्या प्रमाणात साठणारा पालापाचोळा खतात रूपांतरित केला जावा, एक पानही जाळलं जाऊ नये, यासाठी तिने ‘ब्राऊन लीफ’ अंतर्गत मोठी चळवळ यशस्वी करून उदाहरण निर्माण केलं.

आदिती म्हणाली, ‘‘पावसाळ्यात घराजवळच्या झाडाची फांदी पडली. हिचं काय करता येईल, याचा मी समाज माध्यमातून शोध घेतला. काहीजणांचे प्रयोग ध्वनिचित्रफितीतून कळले. मग मी लाकूड कापण्यासाठी करवत, कापताना लाकूड धरून ठेवणारं व्हाइस आणि छिद्र करण्यासाठी ड्रिलिंग मशिन ही आयुधं जमवली. गोल चकत्या कापून, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना करत लॅम्प बनवले. पणत्या ठेवण्यासाठी शोभिवंत स्टॅन्ड तयार केले. बांबू कापून, त्यापासून कलात्मक व उपयुक्त वस्तू बनवण्याचा छंद जडला. बुरुडआळीत फेऱ्या वाढल्या. तिथल्या एका काकांची मदत कटाई सोपी करण्यासाठी झाली.’’

आदितीच्या निसर्गमैत्रीतला महत्त्वाचा भाग म्हणजे बांबूची टोपली, आडव्या कापलेल्या बांबूच्या प्लॅन्टर्समध्ये तिनं जोपासलेली हिरवाई. तिनं स्पष्ट केलं की, एवढ्या प्लॅन्टर्समध्ये वाळलेल्या पानांचा थर असतो. त्यावर गहू, अळीव, मोहरी, मेथ्या वगैरे पेरते. वर पुन्हा हलकासा कंपोस्ट किंवा मातीचा थर. यातून हिरवी रोपं उगवून आली की, ती जिथं ठेवते त्या माझ्या कामासाठीच्या टेबलाचं रूपच पालटतं. या ‘मायक्रो ग्रीन’साठी फार जागा तसंच फार ऊनही लागत नाही. बाल्कनी, खिडक्‍या, टेबल, स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यांमध्ये पोचणाऱ्या उजेडावरही ही मंडळी छान बहरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com