#MondayMotivation : गॅरेज क्षेत्रामध्ये महिलेने घेतली उंच भरारी (Video)

अक्षता पवार
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

वाहन दुरुस्तीचा अनुभव नसताना पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गॅरेजसारख्या व्यवसायात मनीषा पाध्ये यांनी आपल्या कर्तृत्वाने आदर्श ‘बिझनेस वुमन’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी चार गॅरेज टाकले असून आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या उपकरणांची मोटारींसाठी निर्मिती करण्यातही यश मिळवले आहे.

पुणे - वाहन दुरुस्तीचा अनुभव नसताना पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गॅरेजसारख्या व्यवसायात मनीषा पाध्ये यांनी आपल्या कर्तृत्वाने आदर्श ‘बिझनेस वुमन’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी चार गॅरेज टाकले असून आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या उपकरणांची मोटारींसाठी निर्मिती करण्यातही यश मिळवले आहे.

वाणिज्य शाखेमधून शिक्षण घेतलेल्या मनीषा यांचा प्रवास सुरू झाला तो लग्नानंतर. त्यांचे पती उन्मेष पाध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअर आहेत. मनीषा यांचा वाहन दुरुस्तीचा अभ्यास पतीच्या सहकार्यामुळेच परिपूर्ण झाला. त्यामुळे मनीषा यांची या क्षेत्रात गोडी वाढत गेली. सुरवातीला त्यांना एका गॅरेजमध्ये भागीदारीची संधी मिळाली, त्यासाठी त्यांनी जीव ओतला. जिद्द अन्‌ मेहनतीच्या जोरावर त्यांनी गॅरेज सुस्थितीत आणले आणि त्याचवेळी व्यवसायाची मुहूर्तमेढही रोवली. 

मनीषा यांनी नंतर वाहन दुरुस्तीविषयी गॅरेज व्यावसायिक आणि ग्राहकांना सल्ला देण्याची सेवा सुरू करण्याचे ठरवले. आज त्यांच्या पुण्यात चार शाखा आहेत. त्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येतात. मनीषा आणि त्यांच्या पतीने गाड्यांसाठी लागणाऱ्या आधुनिक उपकरणांची निर्मितीही केली आहे. त्यांचा वापर गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो.

‘महिला असतानाही या क्षेत्रात काम करताना मला अभिमान वाटतो. मात्र, बरे-वाईट अनुभवही आले. हे काम जमेल का, असे प्रश्‍न विचारले गेले. मात्र, मी माझे काम करत राहिले,’’ असे मनीषा यांनी सांगितले. इतर महिलांनीही या क्षेत्रात पाऊल ठेवण्यास सुरवात करावी आणि कोणत्याही क्षेत्राला मोठे किंवा छोटे लेखू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

दोन वर्षांपासून मी मनीषा पाध्ये यांच्यासोबत काम करीत आहे. यापूर्वी दुरुस्तीसाठी फारशा गाड्या या गॅरेजवर नसायच्या; मात्र आता कामाचा व्याप वाढला आहे.
- इब्राहिम बलबट्टी, गॅरेज मॅकेनिक

वाहनाबाबत सांगितलेल्या प्रत्येक तक्रारीची येथे काळजी घेतली जाते. वाहन दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे (पार्टचे) बिल राखून ठेवले जाते, त्यामुळे विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे.
- अतिश कुलकर्णी, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manisha padhey garrage success motivation