प्रवाशांच्या सेवेसाठी झटणारा वाहक

शशिकांत सोनवलकर  
गुरुवार, 8 मार्च 2018

दुधेबावी - बसवाहक म्हणजे रागावणारा, ओरडणारा, सतत चिडचीड करणारा अशीच काहीशी प्रतिमा समोर येते. पण, बसमध्ये चढताच वाहक स्वागत करतो, काही महत्त्वाच्या सूचना देऊन उलटी, मळमळ होणाऱ्यांसाठी औषध देतो आणि चालू प्रवासातही ध्वनिक्षेपकावरून समाजप्रबोधन करतो, यावर विश्वास बसणार नाही. पण, असा एक अवलिया वाहकही आहे. त्यांचे नाव आहे चक्रपाणी रामचंद्र चाचर.

दुधेबावी - बसवाहक म्हणजे रागावणारा, ओरडणारा, सतत चिडचीड करणारा अशीच काहीशी प्रतिमा समोर येते. पण, बसमध्ये चढताच वाहक स्वागत करतो, काही महत्त्वाच्या सूचना देऊन उलटी, मळमळ होणाऱ्यांसाठी औषध देतो आणि चालू प्रवासातही ध्वनिक्षेपकावरून समाजप्रबोधन करतो, यावर विश्वास बसणार नाही. पण, असा एक अवलिया वाहकही आहे. त्यांचे नाव आहे चक्रपाणी रामचंद्र चाचर.

बारामती-इचलकरंजी बसमध्ये (क्र. एमएच १४ बीटी २९५५) चढताच श्री. चाचर यांनी प्रवाशांचे मनःपूर्वक स्वागत केले. प्रवासादरम्यानच्या काही सूचना केल्या. तिकीट फाडल्यानंतर हातात ध्वनिक्षेपक घेऊन समाजातील काही प्रथा, परंपरांबाबत प्रबोधन केले. बसमधून उतरताना प्रत्येक प्रवासी त्यांना धन्यवाद देत होते. चक्रपाणी रामचंद्र चाचर (वय ३८) यांचे मूळ गाव मावडी कडेपठार (ता. पुरंदर). २०११ मध्ये ते बारामती एमआयडीसी आगारात रुजू झाले. प्रवाशांचे बसमध्ये स्वागत करणे,  बसमध्ये सजावट करणे, काही धार्मिक प्रबोधनात्मक गाणी वाजविणे, तब्येतीचा त्रास होणाऱ्या प्रवाशांना औषधे देणे, बसमध्ये पिण्याचे पाणी ठेवणे, वर्तमानपत्र ठेवणे अशा अनेक सुविधा देताना एसटी प्रवासाबाबत ते नेहमी जनजागृती करतात.

तिकीट फाडल्यानंतर प्रथम ते प्रवाशांचे स्वागत करतात. नंतर ध्वनिक्षेपक घेऊन एसटी प्रवासाबाबत जनजागृती, लेक वाचवा-लेक शिकवा, झाडे लावा- झाडे जगवा, पाणी आडवा-पाणी जिरवा यासह समाजातील काही चालीरितींबाबत प्रबोधन करतात. 

हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ २६ जानेवारी, १५ऑगस्टला ते कार्यक्रम घेतात. एसटीच्या वर्धापनदिनी स्वखर्चाने बस सजवतात. काही घोषवाक्‍य लिहितात, एलइडी लाईट बसवितात. या सर्व उपक्रमांतून चक्रपाणी चाचर यांनी सरकारी, निमसरकारी नोकरीतही सेवा बजावताना सामाजिक सेवा कशी करता येईल, याचा आदर्श घालून दिला आहे.

सेवेतून आत्मिक समाधान - चाचर
या सर्व सेवेने आपल्याला आत्मिक समाधान मिळत असल्याचे चाचर सांगतात. बसमध्ये प्रबोधन करण्याचे विचार माईकवर मांडत असताना एखादा प्रवासी रागावला असे कधी घडले का, असे विचारले असता त्यांनी या उलट प्रवाशांसह सहकारी चालक बाळासाहेब खुस्पे (धर्मपुरी) हे या कामात प्रोत्साहन देतात, असे आवर्जून नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news MSRTC st bus conductor