'त्या'च्या जिद्दीला सलाम

Santosh Darekar
Santosh Darekar

श्रीगोंदे, (नगर) : बारा वर्षांपुर्वी अपघातात दोन्ही हात निकामी झाले एक हात तर काढून टाकला. तीन महिने अश्रू गाळले मात्र नंतर उठला आणि जिद्दीला पेटला. शेतीत औषध फवारणी, पाणी धरणे यासह जवळपास सगळी कामे करतो, चारचाकी गाडी चालवतो अपंग असल्याची लाज बाळगत नाहीच मात्र इतरांना तो आता खरा मार्गदर्शक ठरला आहे. 

संतोष मारुती दरेकर हा हिरडगाव येथील तरुण त्याच्या जिद्दीमुळे चर्चेत आहे. वडीलांनी पंचवीस वर्षे दुसऱ्यांच्या शेतात सालं घातली. मुलाला पदवीधर केले आणि तो हाताखाली आला. गावात सायकल पंचर काढण्याचे दुकान टाकले. शेतकऱ्यांनी हाताला धरुन रोहित्र दुरुस्त करायला नेले त्याचवेळी प्रवाह सुरु झाला त्यात बसलेल्या शाॅकने दोन्ही हात निकामी झाले. एक लगेच काढून टाकला तर दुसरा नावाला आहे. दुसऱ्या निम्म्याच हाताला वेदना जाणवतात. 

तीन महिने अंथरुणावर होता. जगणार नाही अशीच सगळ्यांची खात्री होती त्यातच खरी गरीबी साथ करीत होती. त्या अवस्थेत पत्नी ज्योती व आई पार्वती या त्याची सगळी दिनचर्या करीत होत्या. त्याला ते पटत नसल्याने तो जिद्दीला पेटला. चालायला येत नव्हते पण त्याला सगळे करुन दाखवायचे होते. 

संतोष सांगत होता, मी सगळी कामे करतो. हात गेले त्यांनतर जिद्दीने एक एकर शेती पिकवायला सुरुवात केली. नातेवाईकांनी आधाराने सरकारकडून बारा एकर माळरानाची सिलींगची जमीन विकत घेतली. चारशे झाडे लिंबू, चार एकर ऊस, कांदा, जनावरे व त्यांचा चारा हे सगळे पुढे होवून पाहतो. हात नाहीत मात्र तरीही पायाने पिकांना पाणी देण्यासाठी बारे देतो. घरचे लोक लिंबू काढतात ते मी खांद्यावर वाहून गाडीत टाकतो व चार चाकी गाडी चालवित श्रीगोंदयाला  नेतो. अगोदर लोक गंमत पाहत होते मात्र मला कशाच कमीपणा वाटला नाही. आज सगळेच लोक माझ्याकडे पाहून कामे करतात याचे समाधान आहे. 

संतोष अपंग होण्यापुर्वी त्याचे सहकारी घेवून कोपरगावला सैन्य भरतीसाठी गेला होता. मात्र तेथे धावताना मैदान मोठे आहे असे सांगून हतबल झाले होते. मात्र संतोषने स्वत: त्या मैदानाच्या फेऱ्या मारुन अधिकाऱ्यांना खुश केले. मात्र त्याचा विवाह झाला होता त्यामुळे तो सैन्यात गेला नाही. 

अंथरुणात पडून होते, त्यांची सगळी दिनचर्या करीत होतो, पण या माणसाने नंतर जिद्दीच्या जोरावर कुटूंबाला सावरताना मुलांना शिकविण्यासाठी धडपड चालवली आहे. पक्के घर बांधले, सगळी सुखे आहेत मात्र आमच्या सारखे दिवस मुलांना पाहावे लागू नये म्हणून आम्ही दु:ख गिळून समाजाच्या सोबत जात आहोत असे डोळ्याच्या कडा पुसताना पार्वतीबाई व ज्योती दरकेर सांगत होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com