‘एकलव्य’ पुरस्कार म्हणजे शाबासकीची थाप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

मला चार मुली व एक मुलगा आहेत. प्रतिमा वगळता बाकी सर्व धडधाकट आहेत. पण, धाकट्या प्रतिमाने स्वत:ला कधीच अपंग मानले नाही. आम्हीही तिला वेगळी ‘ट्रीटमेंट’ दिली नाही. तिने स्वत:च खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलो. भविष्यात ती स्वत:च्या पायावर उभी राहावी, एवढीच आमची इच्छा आहे.
- कृष्णराव बोंडे (प्रतिमाचे वडील)

नागपूर - नियतीने क्रूर थट्टा करून कायमचे शारीरिक अपंगत्व दिले असले, तरी मी स्वत:ला अपंग मानत नाही. उलट, खेळ आणि घर अशी दुहेरी जबाबदारी जिद्दीने पार पाडते आहे. राज्य शासनाचा पुरस्कार माझ्या आतापर्यंतच्या मेहनतीचे फळ असून, चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करणारा असल्याची भावना एकलव्य पुरस्कारविजेती आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिमा बोंडे हिने व्यक्‍त केली.  

३० वर्षीय प्रतिमाला नुकतेच मुंबई येथे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्‍त करताना प्रतिमा म्हणाली, ‘‘कोणताही पुरस्कार खेळाडूला प्रोत्साहन देणारा व त्याचा आत्मविश्‍वास वाढविणारा असतो. माझ्यासारख्या दिव्यांग खेळाडूच्या पाठीवर शासनाने शाबासकीची थाप ठेवावी, हा केवळ माझा एकटीचा सन्मान नाही, तर शारीरिक अपंगत्वावर मात करून ताठ मानेने समाजात वावरणाऱ्या सर्व दिव्यांग खेळाडूंचा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे.

भविष्यात आणखी चांगली कामगिरी करून नागपूर शहराला नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.’’ गतवर्षी दुबई येथील ‘वर्ल्डकप’मध्ये ४५ किलो वजनगटात देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची इच्छा बोलून दाखविली. 

अष्टपैलू प्रतिभेची धनी असलेली प्रतिमा पॉवरलिफ्टिंग, ॲथलेटिक्‍स, टेबलटेनिस आणि तलवारबाजी हे चार खेळ खेळते. उल्लेखनीय म्हणजे, या चारही खेळांमध्ये तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली आहेत. पॉवरलिफ्टिंगमध्ये अधिक रुची असल्याने तिने या खेळावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे. मुनीश्‍वर हेल्थ क्‍लबचे संस्थापक दादोजी कोंडदेव पुरस्कारविजेते प्रशिक्षक विजय मुनीश्‍वर आणि महाराष्ट्र राज्य पॅरालिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष मनोज बाळबुधे यांच्या प्रोत्साहनामुळे आपण या खेळात करिअर केल्याचे तिने मान्य केले.  

पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान असलेली प्रतिमा जन्मजात अपंग नाही. दहा महिन्यांची असताना पोलिओच्या अटॅकमुळे तिच्या शरीराचा एक भाग लुळा पडला. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार व शस्त्रक्रिया केल्यानंतरही तिचा उजवा पाय कायमचा अपंग झाला. तरीही प्रतिमाने शारीरिक अपंगत्वाला न जुमानता जिद्दीने खेळात गरुडझेप घेतली. खेळासोबतच ती शिक्षणातही हुशार आहे. ‘स्पोर्टस कोटा’ किंवा स्पर्धात्मक परीक्षेद्वारे नोकरी मिळवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची तिची इच्छा आहे.

भविष्यातील ‘स्टार’ घडविणार
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रतिमाला भविष्यात युवा खेळाडू घडवायचे आहे. युवा दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील अपंगत्वाची भावना तिला दूर करायची आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nagpur news eklavya award pratima bonde