घोंगडी निर्मितीतून 40 लाखांची उलाढाल 

घोंगडी निर्मितीतून 40 लाखांची उलाढाल 

अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय?... असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्यातून मार्ग काढत कुणी व्यवसाय तर कुणी नोकरीची वाट स्वीकारतो; पण ग्रामीण भागातून आलेल्या दोन तरुणांनी मळलेली वाट सोडली... लुप्त होत चाललेल्या जुन्या घोंगडी निर्मिती कलेकडे ते वळले. त्यावर त्यांनी दोन वर्षे संशोधन केले आणि खड्डामागावर घोंगडी तयार करणाऱ्यांची मदत घेऊन त्यांनी घोंगडीचा स्टार्टअप सुरू केला. नीरज बोराटे आणि तुषार पाखरे अशी या तरुणांची नावे. 

नीरज हा इंदापूरचा, तर तुषार करमाळ्यातला. त्यांनी आधी गोधडी तयार करण्याचे काम सुरू केले. त्यात यश मिळाले. आता ते घोंगडी निर्मितीच्या उद्योगात आले आहेत. मात्र, यंत्रावर घोंगडी तयार करण्याचा सोपा मार्ग त्यांनी निवडलेला नाही. प्राचीन काळापासून खड्डामागावर घोंगडी तयार करण्याच्या कलेने त्यांना आकर्षित केले. परंपरागत काम करणाऱ्या कसबी कलाकारांकडून ते घोंगडी तयार करून घेतात. पूर्वीच्या एकमेव काळ्या घोंगडीपुरते ते थांबलेले नाहीत. त्यातही त्यांनी प्रयोग केले. पाच रंगांची वैविध्यपूर्ण उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. याशिवाय जेन, योग मॅट, छोटी आसने, आसनपट्ट्याही ते बनवतात. व्यवसाय सुरू केल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 40 लाखांपर्यंत पोचली आहे. भारतातच नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील बाजारपेठ त्यांना खुणावते आहे. त्यासाठी तेथील व्यापाऱ्यांकडे त्यांनी सॅंपलही पाठविले आहेत. 

नीरज याबद्दल सांगतो, ""घोंगडी ही प्राचीन कला आहे. घोंगडीला ग्रामीण भागात महत्त्व आहे. धार्मिक कार्यक्रमात ती वापरली जाते. कंबरदुखी, पाठदुखी यावरही ती गुणकारी असल्याचे सांगितले जाते. यातील जेन हाही वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. त्याची उत्पादने आम्ही बाजारात आणत आहोत. साधारण 15 कलाकार त्यासाठी काम करतात. आतापर्यंत साडेसातशे घोंगड्या तयार केल्या आहेत. आमच्याकडे महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, कर्नाटक या राज्यांतून मागणी नोंदविण्यात आली आहे.'' 

""उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर आम्ही केला आहे. आमच्या संकेतस्थळावर मागणी नोंदविली जाते. हा उद्योग वाढविताना घोंगडी, जेन कलाकारांना जगविण्याबरोबर ही कला भारतभर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या स्वयंसेवी आणि हातमाग संस्थांबरोबर आमचा संपर्क सुरू आहे,'' असेही नीरजने याने सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com