होय, इथे माणुसकी अजून जिवंत आहे..!

डी. आर. कुलकर्णी
मंगळवार, 13 मार्च 2018

अपघात घडताना पाहून खरं तर प्रथम मी काहीशी घाबरले; पण लगेचच मनाचा हिय्या करून लोकांना हाक मारली. जखमीला तातडीने दवाखान्यात नेणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. तसेच या रस्त्यावर परत अपघात होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करायचाय. खड्डा बुजवलाय, स्पीडब्रेकर रंगवायचे राहिले आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत.
- सविता झाल्टे, तनिष्का गटप्रमुख, बिबवेवाडी

पुणे - ‘अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे,’ असे कळकळीचे आवाहन साक्षात जखमीपासून ते अगदी पोलिस आयुक्तांपर्यंत सर्वांनी करूनही अपघाताच्या ठिकाणी बघ्यांचीच गर्दी होते. हल्ली तर जखमी व्यक्तीला मदत करण्यापेक्षा सेल्फी काढून व्हायरल करण्याचीच अहमहमिका लागते. यातून माणुसकी हरवल्याचीच भावना पसरू लागली आहे; पण ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या एका महिलेने समोर घडलेल्या अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल तर केलेच, शिवाय अपघातास कारणीभूत ठरलेला खड्डाही स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाच्या सहकार्याने बुजवून घेतला. समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याची बाब या घटनेने ठळक झाली.

मार्केट यार्डात राहणारे बब्रुवान दत्तात्रेय जाधव (वय ५५) हे गेल्या रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर निघाले. रस्ता नेहमीचा अन्‌ त्यावरील स्पीडब्रेकर व त्याला लागूनच पडलेला खड्डाही नेहमीचाच; पण वेळ मात्र बदलली होती. याच खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली अन्‌ ते रस्त्यावर जोरात आपटले. डोक्‍यातून रक्तस्राव झाला, पाठोपाठ ते बेशुद्धही पडले. 
बिबवेवाडीतील तनिष्का गटप्रमुख सविता झाल्टे या सकाळी फिरायला जात असताना त्यांच्यासमोरच हा अपघात घडला. तीव्रता लक्षात येताच त्यांनी रस्त्यावरील काही नागरिकांच्या मदतीने जाधव यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यामुळे जाधव जिवावरच्या संकटातून बचावले.

जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यावरच झाल्टे थांबल्या नाहीत, तर तनिष्का गटातील सदस्यांना त्यांनी अपघाताची माहिती दिली. तसेच अपघाताच्या ठिकाणी नेहमी दिसणाऱ्या भाजीवाले, फुलवाल्यांकडे चौकशी केली. बऱ्याच दिवसांपासून हा खड्डा तसाच आहे. त्यात दुचाकी घसरून आत्तापर्यंत अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती त्यांना मिळाली. स्पीडब्रेकर रंगहीन झाल्याने ते रस्त्यात असल्याचे कळतदेखील नाही, याची जाणीव त्यांना झाली अन्‌ दुसऱ्या दिवशी तनिष्का गटातील सर्व सदस्यांसह थेट नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्याकडे धाव घेतली. रस्त्यावरील खड्डा त्वरित बुजवण्याचा आग्रह सर्वांनी धरला. शिळीमकर यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली अन्‌ तातडीने तो खड्डा बुजवला गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pune news humanity